Chinchwad : नैमिषारण्यात मराठीत रंगली रवींद्र पाठक यांची तुलसीदास विरचित रामचरितमानस रामकथा

(सुनील पाठक)

एमपीसी न्यूज- पौराणिक काळामध्ये ऋषीमुनींचे वास्तव्य असलेल्या उत्तर भारतातील नैमिषारण्यात मराठी भाषेतून चिंचवड येथील उद्योजक रवींद्र पाठक यांनी श्रीमद्गोस्वामी तुलसीदास विरचित रामचरितमानस रामकथा सादर केली. नैमिषारण्य येथील कालीपीठात दिनांक 21 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या कालावधीत ही रामकथा रंगली. ही रामकथा ऐकण्याकरीता महाराष्ट्रातील कानाकोप-यातून सुमारे 800 भक्तगण नैमिषारण्य येथील कालीपीठात जमले होते.

21 सप्टेंबर रोजी सकाळी श्रीमद्गोस्वामी तुलसीदास विरचित रामचरितमानस या ग्रंथाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. नंतर दीपप्रज्वलन करून रामकथेला सुरवात झाली. ही रामकथा रोज सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात विभागली होती. प्रथम सत्रात 88 हजार ऋषीमुनींचे तपःस्थल असलेल्या नैमिषारण्याचे माहात्म्य सांगण्यात आले. या पवित्र भूमीत श्री गोंदवलेकर महाराज यांनीही नैमिषारण्यात 8 वेळा भेट दिल्याचे संदर्भासहित विवेचन करण्यात आले. तसेच या भूमीत पितरांचा वास असल्याने पितृपंधरवड्यात ही कथा होणे फार भाग्याचे व महत्त्वाचे असल्याचे सांगून रामकथेला सुरवात करण्यात आली. नैमिषारण्यारातील या कथेमध्ये मूळ “तपस्या” ही संकल्पना घेऊन, ही रामकथा, श्री रामचरितमानस आणि सद्गुरु ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जीवनचरित्र यांचा सुंदर मिलाफ करत गुंफलेली होती.

एकूण 13 सत्रांमध्ये रामकथेचे एक-एक प्रसंग अप्रतिमरित्या उलगडत नेले. रामायणातील बालकाण्डाचे विवेचन करतांना प्रथम मंगलाचरण, श्रीनाम वन्दना, याज्ञवल्क्य-भरद्वाज संवाद, सती-महादेव कथा, पार्वतीचा जन्म, शिव-पार्वती विवाह, रामजन्मापासून ते रामसीता विवाहापर्यंत सुरेख निरुपण झाले. त्यानंतर अयोध्याकाण्ड रंगले, रामाच्या राज्याभिषेकाची तयारी चालू असतानाच पितृवचनानुसार वनवासाचा स्वीकार करताना श्रीराम-सीता संवाद , श्री लक्ष्मण-सुमित्रा संवाद श्रीराम-वाल्मीकी संवाद याचे विवेचन करण्यात आले. यात सर्वाधिक भावलेला संवाद म्हणजे श्रीराम-भरत संवाद. भरताचे रामावरील आत्यंतिक प्रेमभाव सांगणारा हा प्रसंग फारच सुरेखरित्या अनेक उदाहरणे देऊन रंगविला गेला. रामकथेतीला किष्किन्धाकांंड सांगताना प्रत्यक्ष हनुमान व रामाची भेट हा प्रसंग डोळ्यासमोर साक्षात उभा केला. यातील बालीवध व हनुमान-जांबुवंत संवाद हा या कथेला पुढे घेऊन जातो.

या कथेतील सुंदरकांड निरुपण म्हणजे रामकथेचा मेरूमणीच. हे सर्व रामायण का व कोणामुळे घडले व रामाच्या वनवासाचे कारण कोणते हे सांगणारा हा कांड असून पृथ्वीवरील सर्व दुष्ट शक्तींचा नाश करणारा हा भाग फारच सुंदररित्या कथन करतांना यातील हनुमंताची राम भक्ती, सीता-हनुम़ंत संवाद, लंकादहन आणि श्री राम-हनुमंत संवाद याचे फार सुरेख विवेचन करण्यात आले. हे ऐकताना सर्व भाविकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.

कथेच्या शेवटाकडे येताना लंकाकांड यामध्ये अंगद-रावण संवाद, लक्ष्मण-मेघनाद युध्द आणि रामाचे बंधुप्रेम तसेच हनुमंताची राम आज्ञा हे सांगणारा. यातील राम-रावण युध्द प्रसंग साकारताना, मोठ्याने झालेल्या शंखनादासोबतच, तबला आणि सुरेल बासरी यांची उत्तम साथ मिळाल्यामुळे प्रत्यक्ष युध्दभूमी डोळ्यांसमोर साकार झाली. शेवटी उत्तरकांडातील रामाचे अयोध्येत आगमन व रामराज्याभिषेक. यामध्ये भरत-हनुमान संवाद, राम-भरतमिलाप, काकभुशुण्डी लोमश संवाद खूपच सुंदररित्या रंगविण्यात आला.

अतिशय सुमधूर अशी रामकथा सुरू होण्यापूर्वी रोज अनेक साधकांकडून श्री रामचरितमानस पोथीची हार घालून पूजा केली जायची. कथेनंतर अनेकांच्या हस्ते रामायण ग्रंथाची व महाराजांची आरती होत असे. तसेच दररोज सकाळी श्री महाराजांची काकड आरती होत असे. अत्यंत प्रसन्न आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात ही राम कथा संपन्न झाली. या कथेला अनेक महंत व साधुपुरूषांनी उपस्थिती लाभली होती. अनेक हिंदी भाषिक भक्तगण रामायणातील चौपायावरुन मराठीतील निरुपणाचा अर्थ लावून आनंद घेत होते.

रामकथा कालावधीमध्ये कालीपीठाने साधकांची राहण्याची व जेवणाची उत्तम सोय केली होती. सर्व साधकांना लखनऊ ते नैमिषारण्य आणणे व नेणे यांची उत्तम सोय केली होती. नैमिषारण्य येथील कालीपीठ येथे कालीमातेची भव्य मूर्ती असून श्री गोंदवलेकर महाराजांची मूर्ती व मोठा फोटो यांची त्या ठिकाणी नित्य नेमाने उपासना होत असते.

कालीपीठाचे विश्वस्त जगदंबाप्रसाद शास्त्री गोपाळ शास्त्री व भास्कर शास्त्री यांनी येणाऱ्या सर्व साधकांची खूपच आस्थेने व मनोभावे सेवा केली. नैमिषारण्य सारख्या उत्तर भारतातील पवित्र स्थानी प्रथमच एवढया मोठ्या प्रमाणात उपस्थित श्रोतृवर्गासमोर मराठीमध्ये रामकथा संपन्न झाली. येथील उत्तम नियोजन आणि आखीव कार्यक्रमामुळे ही रामकथा सर्व श्रोत्यांच्या अखंड स्मरणात राहिली.

रवींद्र पाठक हे गोँदवले येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे निस्सीम भक्त असून श्री महाराजांचे अनुग्रहित आहेत. श्री महाराजांचे गोंदवले येथे समाधी मंदिर असून सुमारे 106 वर्षापूर्वी सन 1913 मध्ये श्री गोंदवलेकर महाराज येथे समाधिस्थ झाले. रवींद्र पाठक हे स्वतः गोल्ड मेडलिस्ट इंजिनियर असून व्यवसायाने कारखानदार आहेत. पुणे येथे रवी इंडस्ट्रीज या नावाने त्यांची कंपनी आहे. पाठक यांचा दासबोध, मनाचे श्लोक, ज्ञानेश्वरी, श्रीमद्भगवद्गीता, श्रीमद्गोस्वामी तुलसीदास विरचित रामचरितमानस, श्रीमद्भागवत इत्यादी ग्रंथाचा सखोल अभ्यास असून त्यांची अनेक पुस्तके व सीडी प्रकाशित झाल्या आहेत.

रवींद्र पाठक यांची गोंदवले येथे व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रवचन सेवा नियमितपणे होत असते. त्यांनी स्वतः प्रपंच आणि परमार्थ यांची उत्तम सांगड घालून आधुनिक काळातील युवकांना मोठा आदर्श घालून दिला आहे. अतिशय सोप्या शब्दांत आत्ताच्या काळातील उदाहरणे देत आपल्या ओघवत्या रसाळ वाणीतून मनोबोध व दासबोध यांचे निरुपण चार वर्षे रोज व्हाट्स ऍपद्वारे अनेक साधकांना नित्य नियमाने पाठविले जात असे. तसेच सध्या मागील दोन वर्षापासून रोज श्रीमद्गोस्वामी तुलसीदास विरचित रामचरितमानस वरील निरुपण व्हाट्स ऍपद्वारे पाठवले जात आहे. देश विदेशात अनेकजण त्यांचे निरुपण नियमितपणे ऐकत असतात. जानेवारी 2019 मध्ये बहारीन येथील प्रसिद्ध कृष्ण मंदिरात त्यांची प्रवचन सेवा झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.