Lonavala : भुशी धरणाच्या जंगलातील धबधब्यात अडकलेल्या चार तरुणांची सुटका

एमपीसी न्यूज- भुशी धरणाच्या जंगलातील धबधब्यात अडकलेल्या पिंपरीच्या चार तरुणांची शिवदुर्ग टीमच्या रेस्क्यू पथकाने सुखरूप सुटका केली.

मागील शुक्रवारी (दि. 4) भुशी धरणाच्या जंगलात रज्जाक (वय 24), कुणाल (वय 22), सलेह (वय 22) व अमरकुमार (वय 24) हे तरुण सकाळी फिरण्यासाठी गेले होते. दुपारी पाऊस झाल्यामुळे तेथील एका धबधब्याजवळ चौघेजण अडकून पडले. त्यांना खाली यायची वाट सापडत नव्हती. त्यामुळे त्यांनी लोणावळा पोलिसांशी मोबाइलवरून संपर्क साधला.

लोणावळा पोलिसांनी त्वरित शिवदुर्ग टीमच्या रेस्क्यू पथकाला पाचारण केले. तत्पूर्वी लोणावळा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई होले, पोलीस शिपाई कराड, पोलीस शिपाई कोळी, होमगार्ड कोकाटे तसेच स्थानिक व्यावसायिक शशिकांत शिंदे, लक्ष्मण शेडगे, ओंकार चव्हाण, संतोष धोत्रे, विकास चव्हाण हे पुढे गेले.

त्यानंतर लगेच शिवदुर्ग टीमचे सुनील गायकवाड, आनंद गावडे, अनिल सुतार, शैलेश भोसले व साहेबराव चव्हाण हे या ठिकाणी पोचले. त्यांनी धबधब्यातून त्या तरुणांना खाली घेऊन ओढयातून व जंगलातून सुखरूप खाली आणले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.