Pune : ललित कला केंद्र विद्यार्थ्यांच्या ‘फोरिओग्राफी’ या कल्पक नृत्य संरचनांना प्रतिसाद

एमपीसी न्यूज- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी चार संकल्पनांवर सादर केलेल्या कल्पक अशा नृत्य संरचनांना शुक्रवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला. ‘फोरिओग्राफी ‘असे या कार्य्रक्रमाचे नाव होते. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत या नृत्य संरचना सादर झाल्या.त्याला उपस्थित प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

विद्यार्थ्यांच्या वाचन, चिंतन, अभ्यासाच्या ‘मंथना”तून स्फुरलेल्या चार संकल्पनांवर आधारित “फोरिओग्राफी” हा ४ नृत्य संरचनांचा कार्यक्रम सादर झाला. यातून विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तिला सृजनशिलतेला प्रोत्साहन देणे, चालना देणे हा या कार्यक्रमामागचा उद्देश्य आहे, अशी माहिती सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे प्रा डॉ परिमल फडके यांनी दिली. यावेळी भारतीय विद्या भवन चे मानद सचिव प्रा नंदकुमार काकिर्डे, ज्येष्ठ नृत्य गुरू डॉ सुचेता भिडे-चापेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

यात पहिल्या नृत्य संरचनेत चंद्र आणि रोहिणी यांच्या पुराणकथेतील प्रेमकथेवर आधारित नृत्य सादर करण्यात आले, याची संकल्पना व दिग्दर्शन वैष्णवी निबाळकर हिचे होते. दुसरी नृत्य संरचना मनुष्याच्या मनाच्या नैराश्य अवस्थेतील अबोलपणावर आधारित “नैराश्य” या संकल्पनेवर होती, ही संकल्पना व दिग्दर्शन दीक्षा वायदंडे हिचे होते.

तिसरी नृत्य रचना ही “मी आणि आम्ही” या विषयाला वाहिलेली होती, आजच्या धकाधकीच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाने जीवघेणी स्पर्धा केलीच पाहिजे का? या प्रश्नाभोवती फिरणारी ही नृत्य रचना ऋतुजा पोफळे हिने दिग्दर्शित केली, तर चौथी रचना ही “मानस दृष्टि”या संकल्पनेवर होती. यात एखादा विचार मानसिकतेनुसार व त्या त्या व्यक्ति च्या दृष्टीकोनानुसार कसा बदलत जातो यावर नृत्य रचना सादर केली, संकल्पना व दिग्दर्शन रेणुका टिकरे हिचे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्या धिडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.