Pune : ‘बिझनेस लिटरेचर’मुळे उद्योजकतेला चालना- डॉ. रघुनाथ माशेलकर

'इंडिया बिझनेस लिटरेचर फेस्टिवल'चे उद्घाटन

एमपीसी न्यूज -“यशस्वी उद्द्योजक बनण्यासाठी महत्वाकांक्षा आणि ज्ञान या गोष्टी आवश्यक आहेत. स्टार्टअप इंडियामुळे व्यवसाय करत नोकऱ्या निर्माण करण्याकडे तरुणांचा, विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. उद्योजकता विकसनासाठी निरनिराळे कार्यक्रम, धोरण राबविले जात आहे. नवउद्योजकांना आर्थिक साह्यदेखील देण्यात येत आहे. तरुणांनी मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसायाकडे वळावे हा या मागील उद्देश आहे. चांगले आणि सकस ‘बिझनेस लिटरेचर’ उपलब्ध झाले, तर उद्योजकतेला चालना मिळेल. त्यासाठी इंडिया बिझनेस लिटरेचर फेस्टिवल यासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना व्यावसायिकतेकडे वळण्यासाठी उपयुक्त ठरतील,” असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.

आयसीएफएआय बिझनेस स्कुल, इन्स्टिट्यूट फॉर जनरेटिव्ह लीडरशिप, होप फाउंडेशनचे आयस्क्वेअरआयटी इंजिनिअरिंग कॉलेज आणि बीडब्ल्यू बिझनेसवर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या इंडिया बिझनेस लिटरेचर फेस्टिवलचे (आयबीएलएफ) उद्घाटन डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले. शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मिनी ऑडिटोरियममध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी ‘केपीआयटी’चे सहसंस्थापक रवी पंडित, उद्योजक डॉ. गणेश नटराजन, ‘बिझनेस वर्ल्ड’चे डॉ. अनुराग बत्रा, आयसीएफएआय बिझनेस स्कुलच्या संचालिका प्रा. ज्योती टिळक, होप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या अध्यक्षा अरुणा कटारा, फेस्टिवलचे संयोजक आणि लेखक समीर दुआ, होप फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुणा कटारा, ‘सीओईपी’चे संचालक डॉ. भारतकुमार अहुजा उपस्थित होते.

उद्योजकता विषयावर लिहलेल्या साहित्यावर २० लेखकांनी फेस्टिवलमध्ये चर्चा केली. ‘टेडएक्स’च्या धर्तीवर आयोजित या फेस्टिवलमध्ये प्रत्येकी लेखकाने १८ मिनिटात आपले मनोगत मांडले. त्यामध्ये नॅसकॉमचे माजी अध्यक्ष किरण कर्णिक, डॉ. शिरीष जोबळे, लेखक आर. गोपालकृष्णन, किशोर चक्रवर्ती, जयराम ईश्वरन, अपर्णा राजे, अवार्ड विनिंग व्हायरल व्हिडीओ मार्केटर आशिष चोप्रा, टूलटेक ग्लोबल इंजिनिअरिंगचे संस्थापक अतुल खन्ना, एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च अधिष्ठाता डॉ. रंजन बॅनर्जी, लेखक-पत्रकार पवन लाल, जाहिरात दिग्दर्शक प्रल्हाद कक्कर, लेखक-संपादक शशांक शहा, मानसोपचारतज्ज्ञ सैलजा मनाचा, लेखक नरेंद्र गोईदानी, लेखक-वकील मुक्ता महाजनी आदींचा समावेश होता.

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, “बिजनेस लिटरेचर फेस्टिव्हलची कल्पना पुण्यात आली ही आनंदाची गोष्ट आहे. हा विचार देशभर पसरेल. बेडूकउडी न घेता हनुमान उडी घेण्याची आपली मानसिकता हवी. धीरूभाई आंबानी सारखे आदर्श आपल्यासमोर आहेत. उद्योगक्षेत्रात संकुचीत दृष्टी न ठेवता उत्तुंग उडी घेण्याचे स्वप्न बाळगले पाहिजे. येत्या काळात भारत हा विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात जगात सर्वात पुढे असेल. या क्षेत्राबाबत आपल्या लोकांमध्ये जगरूकता निर्माण झाली आहे. ‘चंद्रयान-2’ मोहिमेवर सर्व भारतीयांचे लक्ष होते. लोकांचा उत्साह आणि त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. शासनस्तरावर चांगले धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. याचा फायदा नव्या पिढीतील तरुणांना उद्योगात येण्यासाठी नक्की होईल.”

प्रास्ताविकात अरुणा कटारा म्हणाल्या, “उद्योग क्षेत्राची ओळख वडील प्रकाश छाब्रिया यांच्यामुळे झाली. इथे सतत नवीन गोष्टी समजून घ्याव्या लागतात. या क्षेत्रात साहित्यनिर्मिती व्हावी आणि भावी पिढीला त्याचा लाभ व्हावा, या उद्देशाने हे लिटरेचर फेस्टिवल भरवत आहोत.” डॉ. भारतकुमार अहुजा यांनी स्वागत करताना अशा फेस्टिवलच्या आयोजनामागील महत्व विशद केले. प्रा. वैदही बॅनर्जी यांनी सूत्रसंचालन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.