Pune : मान्यवर नेत्यांच्या सभांमुळे निवडणुकीच्या प्रचारात येणार रंगत

दसऱ्याच्या मुहूर्तावर उमेदवारांचा धुमधडाक्यात प्रचार सुरू

एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रकाश आंबेडकर यांच्या सभेने विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापणार आहे.

2014 मध्ये पुणे शहरातील आठही मतदारसंघात कमळ फुलवणाऱ्या भाजपला 2019 ची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात सभा होण्यासाठी पुणे शहर भाजपने पक्षाकडे मागणी केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या राज्यात नऊ सभा होणार असून, 17 ऑक्टोबर रोजी पुण्यात सभा होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

अमित शहा यांच्या 18 सभा होणार आहेत. या सभांमधून ते काँग्रेस – राष्ट्रवादीचा समाचार घेणार आहेत. विशेषतः शहा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टार्गेट केले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी शरद पवार यांनी काय केले ? असा सवाल शहा यांनी उपस्थित केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना मी कधी कारागृहात गेलो नाही, अशा शब्दांत पवार यांनी शहा यांच्यावर हल्लाबोल केला होता.

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आता प्रचारात रंगत येणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा सभेचे नियोजन सुरू आहे. ईडीच्या नोटिसीनंतर शरद पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. 9 ऑक्टोबरला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. ते कोणाचा समाचार घेणार याकडे लक्ष लागले आहे. ईडी चौकशीनंतर राज शांतच होते. तर, दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार यांची एकत्रित जाहीर सभा करण्याचे नियोजन सुरू आहे. स्टार प्रचारक म्हणून राहुल गांधी यांनाही मागणी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.