Pimpri : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे संत तुकाराम नगर, आकुर्डी, सांगवी येथे शस्त्रपूजन

एमपीसी न्यूज- विजयादशमीच्या निमित्ताने सोमवारी (दि. 7) राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे संत तुकाराम नगर, पिंपरी, आकुर्डी, सांगवी या ठिकाणी
शस्त्रपूजन आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

संत तुकारामनगर येथे झालेल्या कार्यक्रमाला रा स्व संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे तरुण व्यवसाय कार्य प्रमुख प्रकाशराव मिठभाकरे यांनी मार्गदर्शन केले.

मीठभाकरे म्हणाले, ” हिंदू धर्मात आणि त्यातही महाराष्टात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. हिंदूंच्या सर्व देवीदेवतांच्या हाती कुठलं ना कुठलं तरी शस्त्र आहे. प्रसंग पडल्यास हाती शस्त्र घेऊन स्त्रीने तेवढ्याच सक्षमपणे उभं राहणं ही काळाची गरज आहे”

स्वातंत्र्ययुध्दात इंग्रजांविरुद्ध संपूर्ण देश लढला. महात्मा गांधींचे एक विशिष्ट योगदान त्यात जसे आहे तसेच इतरही बऱ्याच जणांचं योगदान आहे. हा विस्तृत इतिहास आपल्या सर्वांसमोर काही कारणास्तव आला नाही असे सांगताना त्यांनी चंद्रशेखर आझाद यांचे सर्वोच्च बलिदान कसे झाले हे सांगितले. आजघडीला देशभरात बोकाळलेला आतंकवाद संपवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. तो ज्या पद्धतीने संपवायला हवा त्याच पद्धतीने संपवला जात आहे. काश्मीरच्या सद्यस्थितीवर मीडिया आणि या देशातील काही विकृत मंडळी दिशाभूल करून, खोटीनाटी मांडणी करून प्रश्नचिन्ह उभे करू पाहत आहेत जे सर्वस्वी चुकीचे आहे. ज्यावेळी काश्मिरी हिंदूंना चिरडले गेलं त्यावेळी हे सर्व लोक कुठे होते ? असाही प्रश्न मीठभाकरे यांनी उपस्थित केला. संघाच्या शाखेत मुलांना शिकवले जाणारे खेळ, उपक्रम हे त्यांची सर्वांगीण जडणघडण करण्यास मदत करतात. शरीर, मन, बुद्धी आत्मा यापैकी शरीर, मन आणि बुद्धीवर समान संस्कार करण्याचं काम शाखेच्या माध्यमातून होतं, असे मीठभाकरे म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर कार्यवाहपंकज चापोलीकर यांनी केले. विजयादशमीचे हिंदू धर्मात आणि संघात कसे महत्व आहे हे त्यांनी थोडक्यात सांगितले. संत तुकाराम नगरातील संघकामाची माहिती उपस्थित नागरिकांना देताना संघाच्या कामात, विविध उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते.

आकुर्डी येथील कामयानी विद्या मंदिरच्या मैदानावर पार पडलेल्या शस्त्रपूजन मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक व सरस्वती विश्व विद्यालयचे प्रमुख के. विश्वनाथन नायर उपस्थित होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत, बौद्धिकमंडळ सदस्य, योगेश्वर घोगले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

“पूर्वीपासून कठोर परिश्रमातून संघ भारतमातेला परम वैभवाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील आहे. आज संघकामाला जरी जनमानसात प्रसिद्धी आणि पाठिंबा असला तरी हिंदूंमधले सर्व दुर्गुण दूर करण्याचे आणि सर्व हिंदूंना सद्गुणांनी युक्त करण्याचे काम अजून संपले नाहीये आणि ते आपण निरंतर करत राहणार आहोत” असे योगेश्वर घोगले म्हणाले.

प्रास्ताविक नगर कार्यवाह रजनीश तेलंग यांनी केले. शस्त्रपूजन आणि विजयादशमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. उत्सवाला ११८ स्वयंसेवक व परिसरातील नागरिक उपस्थित होते. उत्सवामध्ये पारंपरिक शस्त्रांचे पूजन करत दंड व व्यायामयोगांची प्रात्यक्षिके सर्व स्वयंसेवकांनी सादर केली.

सांगवी येथे झालेल्या शस्त्रपूजन सोहळ्याला पुणे विभाग प्रचारक लक्ष्मणजी सुराजी यांनी मार्गदर्शन केले. लक्ष्मणजी सुराजी म्हणाले, ” भारत हे प्राचीन राष्ट्र, काश्मीर ते कन्याकुमारी दसरा वेगवेगळ्या नावांनी साजरा होतो त्यास हिंदुत्वाचा धागा कारणीभूत आहे. दसरा हा धर्माचा अधर्मावर विजय म्हणून आपण बघतो तसेच पांडवांनी दसर्यालाच त्याची शस्त्र शमीच्या झाडावरून काढली आणि क्षात्रधर्माची पुनःप्रतिष्ठा केली, हाच भाव मनात ठेऊन डॉ हेडगेवार यांनी 1925 साली दसर्याच्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. डॉ हेडगेवार यांनी भारतावरील सततची परकीय आक्रमणे आणि संघर्षाचा इतिहास याचे मूलभूत चिंतन केले आणि निष्कर्ष काढला की या समस्येचे कारण हे एकच की इथला हिंदू समाज संघटित नाही तो विविध जाती, पंथ, उपासना पद्धतीत विखुरला गेलेला आहे त्याचे सुसंघटन करायला हवे आणि त्यासाठी त्यांनी दैनंदिन एक तासाची शाखा असे अभिनव तंत्र विकसित केले की ज्या शाखेतून रोज एक तास एकत्रित येण्याने आणि नियोजित कार्यक्रम केल्याने राष्ट्रीय चारित्र्याच्या व्यक्ती निर्माण होतील ज्या व्यक्ती देशाला, समाजाला आपल्या आधी ठेवतील”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.