Pimpri : बंडखोरी करुन तीन नगरसेवक आजमावताहेत नशीब !

तिघांनीही केलीय बंडखोरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तीन नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तीघेही बंडखोरी करत आपले नशीब आजमावत आहेत. शिवसेना गटनेते राहुल कलाटे, भाजपच्या स्थायी समितीच्या माजी सभापती, ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे आणि भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील मित्र पक्ष भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. ‘बॅट’ चिन्हावर कलाटे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी जगताप यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळण्याची शक्यता असून दोघांमध्ये सरळ लढत होत आहे.

रावेत-किवळे मधून भाजप चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी पिंपरी मतदारसंघातून बंडखोरी केली आहे. महायुतीतील मित्र पक्ष शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांच्याशी त्यांची लढत आहे. ‘अंगठी’ चिन्हावर ओव्हाळ निवडणुकीला सामोरे जात आहेत.

भाजपच्या स्थायी समितीच्या माजी सभापती, ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे या देखील बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघातून त्या नशीब आजमावत आहेत. स्वपक्ष भाजपचेच विद्यमान आमदार रमेश बुंदिले यांच्याशी त्यांची लढत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.