Pune : दर्पण आर्ट गॅलरीमध्ये ‘नवरंग’ हस्तकला प्रदर्शन सुरु

एमपीसी न्यूज -‘सेमी प्रेशिअस’ खड्यांचे दागिने, उशांचे अभ्रे, पिशव्या, टेबलक्लॉथ, क्रोशाच्या वस्तू आणि दागिने, पेंटिंग केलेली ड्रेस मटेरिअल्स, टाकाऊ पासून टिकाऊ आणि आकर्षक वस्तू आदि वस्तू आपण अन्यही प्रदर्शनांमध्ये पाहतो. परंतु शंभर टक्के हाताने कलाकुसर करून एकमेवाद्वितीय, मन मोहून घेणाऱ्या या वस्तूंचे ‘नवरंग प्रदर्शन’ आज ‘ पत्रकार नगर येथील दर्पण आर्ट गॅलरी येथे सुरु झाले आहे. प्रदर्शन 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी साडेसात या वेळात सर्वांसाठी खुले राहणार आहे.

मशीनमधून निघणाऱ्या एकसारख्या नमुन्यापेक्षा मानवी हातांनी स्वतःच्या सर्जनशीलतेतून निर्माण केलेली कोणतीही वस्तू नेहमीच सगळ्यांचे लक्ष आणि मन मोहून घेते. अशाच काही लक्षवेधी हस्तकलांचे हे प्रदर्शन आहे. वेगवेगळ्या हस्तकलांमध्ये पारंगत असणाऱ्या नऊ महिला एकत्र येऊन हे ‘नवरंग’ हस्तकला प्रदर्शन भरविले आहे. ‘नवरंग’ या हस्तकला प्रदर्शनात श्रुती भागडीकर, श्यामला लोणकर, दीप्ती बवाणे, दीपाली पाठक, अनन्या बोस, अर्चना कुलकर्णी, प्रीतम तुळशीबागवाले, सोनाली राणे, प्रणाली पारसनीस या नऊ महिला कलाकार आपल्या पर्यावरणपूरक व टिकाऊ अशा ९ विविध हस्तकलांमधील कलाकृती येथे प्रदर्शित करणार आहेत.

यात चांदीची व क्रोशाचे दागिने, कपडे व ड्रेस मटेरीअल्स, बॅग्ज आणि सौंदर्य प्रसाधने, सिरामिकची भांडी, बागेतील शोभेच्या वस्तू येथे उपलब्ध आहेत.हाताने पेंटिंग करून मग त्याचे पॅच वर्क केलेले बेडशीट, अभ्रके, पिशव्या प्रदर्शनात शिरताच तुमचे लक्ष वेधून घेतात. चांदीची तार आणि ‘सेमी प्रेशिअस’ खड्यांच्या दागिन्यांवर नजर खिळल्याशिवाय राहत नाही. हल्लीच्या फ्लॅट सिस्टीमच्या घरातही तुम्ही सुंदर बाग फुलवू शकता आणि त्यासाठी आवश्यक पर्यावरणपूरक सर्व सामग्री मार्गदर्शनासह येथे मिळू शकते.

त्याचप्रमाणे क्रोशाने विणलेले आकर्षक रंग असलेले ‘बुकमार्क’, कीचेन, वॉल हँगिंग, टाकाऊ लाकूड, कागद, तारा यांच्यापासून बनविलेल्या आकर्षक व टिकवू वस्तू, हाताने केलेली इम्ब्रोयडरी, पेंटिंग याचे सुरेख नमुने असलेले कुर्त्यांचे कापड, ओढण्या येथे बघायला मिळतात. तसेच सिरामिकच्या फ्लोटिंग पणत्या, विविध पॉटरी नमुने, कापडी पिशव्या, अस्सल जैविक व आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधने यांचेही वैविध्य येथे बघायला मिळते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.