Pimpri: सोशल मिडीयावर चढलाय राजकीय रंग !

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या सोशल मीडियावर राजकीय रंग चढला आहे. विविध राजकीय मुद्यांना भावनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न देखील यातून होत आहे. त्याचा तरुणाईच्या मनावर काय परिणाम होतो, हे निवडणुकीच्या निकालानंतरच दिसेल. पण, सध्या तरी या राजकीय मुद्यांवर सोशल मीडियावर चांगलेच घमासान रंगले आहे.

देशात सध्या आर्थिक मंदी अन् बेरोजगारीचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आल्याने स्थानिक मतदारसंघाच्या विकासाचाही मुद्दा मतदारांमध्ये चर्चेचा विषय होत आहे. कॉलेज कट्टा ते सोशल मीडियावर या चर्चेला उधाण आले असून, विविध राजकीय नेत्यांना नेटकरी चांगलेच ट्रोल करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांची आश्वासने अन् स्थानिक विकास कामांची वास्तविकता यावरून घमासान सुरू आहे.

सत्ताधारी पक्षांसोबतच विरोधी पक्षाच्या उमेदवारांचीही व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्यूटरसारख्या सोशल माध्यमांवर नेटक-यांकडून चांगलीच कानउघाडणी सुरू झाली आहे. यासोबतच यंदाच्या निवडणुकीत उमेदवाराला कोणत्या कामासाठी मतदान कराल, असाही सवाल नेटक-यांकडून विचारल्या जात आहे. विविध मुद्यांवर राजकीय नेत्यांना ट्रोल करण्यासोबतच काही मुद्यांना भावनिकतेची जोड देत मतदारांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.