Lonavala : माजी नगराध्यक्ष अमित गवळी यांचा राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा

एमपीसी न्यूज- लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष अमित प्रकाश गवळी यांनी शनिवारी (दि. 12) राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा शहराध्यक्ष जीवन गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केला. वैयक्तिक कारणामुळे हा राजीनामा दिला असल्याचे गवळी यांनी पत्रात म्हटले आहे.

मागील पंचवार्षिक काळांमध्ये गवळी यांनी लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषवले होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवार जाहीर करण्यास विलंब झाल्याने राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासून गवळी हे राजकारणापासून अलिप्त होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारात मात्र गवळी यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

मावळ तालुक्यात राष्ट्रवादीने भाजपमध्ये बंडखोरी केलेले सुनील शेळके यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब नेवाळे यांनी चार दिवसांपूर्वी समर्थकांसह राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन जिल्हा बँकेचे संचालक पद व दूध संघाचे संचालकपद यांचा देखील राजीनामा दिला तसेच राजकारणातून अलिप्त होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आता लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षांनी राष्ट्रवादीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने मावळात राष्ट्रवादीला धक्क्यांवर धक्के सुरु आहेत. याचा त्रास मात्र राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारलेल्या शेळके यांना होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.