Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभेसाठी स प महाविद्यालयातील झाडे कापली

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावरील 20 ते 25 झाडे कापण्यात आली. येत्या गुरुवारी (दि. 17) मोदी यांची या मैदानावर सभा होणार आहे. मैदानात समोरच्या बाजूला व्यासपीठ उभारण्यात येत आहे. व्यासपीठ उभारण्यात अडचण येत असल्याने ही झाडे कापण्यात आली आहेत. दरम्यान महापालिकेच्या परवानगीने ही झाडे कापण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

नियोजित व्यासपीठाजवळ 16 झाडे होती. त्यामध्ये काही बाभळीची झाडे होती. व्यासपीठ उभारण्यात अडचण येत असल्याने ही झाडे कापण्यात आली. दोन झाडे तशीच असून एक झाड पावसामुळे पडले आहे.

“पुणे महापालिकेच्या परवानगीने ही झाडे कापण्यात आली असून यामध्ये काही चुकीचे नाही” असे स्पष्टीकरण शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन यांनी दिले आहे.

14 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने पुण्यात आले होते. त्यावेळीही सिंहगड रस्त्यावरील झाडे कापण्यात आल्याचा प्रकार घडला होता. मुख्यमंत्र्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले होते. पण, कारवाई काही झाली नाही. राष्ट्रवादी काँगेसने याचा निषेध केला होता. आता नरेंद्र मोदी यांच्या सभेकरिता झाडे कापल्याने पर्यावरणप्रेमींकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

मेट्रोच्या कारशेडसाठी मुंबईच्या आरे कॉलनी मधीलही 2700 झाडे रातोरात कापण्यात आली होती. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याचा तीव्र शब्दात निषेध केला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.