Chinchwad: जगताप यांची ‘हॅटट्रिक’ की कलाटे विजयाचा ‘सिक्सर’ मारणार ?

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – सुरुवातीला एकतर्फी वाटणारी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक शेवटच्या टप्प्यात टफ झाली आहे. भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्यासमोर शिवसेना बंडखोर राहुल कलाटे यांनी जोरदार वातावरण निर्मिती करत तगडे आव्हान निर्माण केले आहे. त्यांना राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, वंचित आघाडीने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जगताप विजयाची हॅटट्रिक करतात की विरोधकांची मोट बांधलेले राहुल कलाटे ‘बॅट’च्या सहाय्याने ‘सिक्सर’ मारून काही चमत्कार घडवितात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

चिंचवड मतदारसंघ राज्यातील दुसऱ्या क्रमांचा मोठा मतदारसंघ आहे. पाच लाख 18 हजार 309 मतदार आहेत. चिंचवडमधून भाजपकडून लक्ष्मण जगताप, अपक्ष राहुल कलाटे यांच्यासह 11 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चिंचवड मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून 2009 (अपक्ष) आणि 2014 मध्ये (भाजप) जगताप आमदार असून, सलग तिसऱ्या विजयासाठी ते भाजपकडून रिंगणात उतरले आहेत.

निवडणुकीच्या सुरुवातीला जगताप यांच्यासाठी एकतर्फी निवडणूक वाटत होती. विरोधकांकडे तगडा उमेदवार नव्हता. त्यामुळे जगताप यांना कोणाचे आव्हान असणार याची उत्सुक्ता लागली होती. अखेरीस राष्ट्रवादीने खेळी करत पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज बाद करवला. जगतापांची कोंडी करण्यासाठी भाजपचा मित्र पक्ष असलेल्या आणि अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला. काँग्रेस, मनसे, वंचित आघाडीने देखील कलाटे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे कलाटे यांचे बळ वाढले.

_MPC_DIR_MPU_II

कलाटे यांना एकेकाळी जगताप यांचे शिष्य असलेल्या अनेकांचे बळ मिळाले आहे. विरोधक व नाराजांची मोट बांधून कलाटे यांनी पदयात्रा, रॅली, कोपरा सभा घेत मतदारसंघात जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. जगताप यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे चिंचवडच्या लढतीमध्ये रंगत निर्माण झाली आहे. शेवटच्या टप्प्यात जगताप आणि कलाटे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत. एकमेकांविरोधात पत्रक काढून आरोप केले गेले.

लक्ष्मण जगताप मुरब्बी आणि अनुभवी राजकारणी आहेत. मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. भविष्याचे नियोजन ते मतदारांना सांगत आहेत. त्यांच्यामागे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ आहे. भाजपच्या निष्ठावंत मतदारांची मोठी संख्या असल्याने भाजपसाठी हा मतदारसंघ सुरक्षित मानला जातो. मतदारसंघात जगताप यांचे चांगले नेटवर्क असून यावेळी शिवसेना सोबत आहे.

शिवसेना बंडखोराशी खासदार श्रीरंग बारणे यांचे जमत नाही. शिवसेनेचा आणि कलाटे यांचा काडीचाही संबंध नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, हकालपट्टी केलेली नाही. लोकसभा निवडणुकीत नाईलाजाने का होईना जगताप यांनी बारणे यांच्याशी जुळवून घेतले होते. त्यामुळे बारणे यांना चिंचवडमधून मोठे मताधिक्य मिळाले होते. त्याची परतफेड बारणे करतील, असा जगताप यांना विश्वास आहे. बारणे यांची साथ मिळाल्याने जगताप यांचे पारडे जड असल्याचे दिसून येते. तर, अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, रिंगरोड आणि शास्तीकराचे प्रश्न त्यांना अडचणीचे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मतदारसंघातील विस्कळीत पाणीपुरवठा, अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रिंगरोड हे प्रलंबित प्रश्न का सुटले नाहीत, असा सवाल करत कलाटे मतदारांसमोर जात आहेत. एका भागाचा विकास म्हणजे मतदारसंघाचा विकास होत नाही. एकवेळ संधी द्या प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन कलाटे यांच्याकडून दिले जात आहे. त्यामुळे मतदार जगताप यांना साथ देऊन हॅटट्रिक करण्याची संधी देतात की ‘बॅट’च्या सहाय्याने कलाटे यांना ‘सिक्सर’ मारण्याची संधी देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

2014 मधील चित्र
लक्ष्मण जगताप (भाजप) : 1,2,786
राहुल कलाटे (शिवसेना) : 63,489
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) : 42,553

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.