Pimpri : राजकीय कार्यकर्त्यांवर आहे पोलिसांचा ‘वॉच’

साध्या वेशातील पोलिसांची पाळत ; सोशल मीडियावरील पोस्टचीही पोलिसांकडे नोंद

एमपीसी न्यूज- विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 21) मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर गुरुवारी (दि. 24) मतमोजणी करण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस कार्यकर्त्यांच्या हालचालींवरही पाळत ठेवून आहेत. त्यामुळे अतिउत्साही कार्यकर्त्यांनी समाजात वावरताना किंवा सोशल मीडियाचा वापर करताना दक्षता घेण्याची गरज आहे.

पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत प्रामुख्याने पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ हे चार मतदारसंघ येतात. याव्यतिरिक्त चाकण, आळंदी, दिघी, भोर, खडकवासला आणि वडगावशेरी या सर्व मतदार संघाचाही काही भाग येतो. या सर्व ठिकाणी पोलिसांची करडी नजर आहे. त्यासाठी तब्बल साडेचार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

आयुक्तालयात 40 बूथ कायदा व सुव्यवस्थेच्या अनुंषगाने संवेदनशील असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्या ठिकाणी होमगार्ड आणि केंद्रीय दलाचे पोलिस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलीस नजर ठेवून आहेत. त्यासाठी उमेदवारांच्या प्रचार रॅली, कोपरा सभा यामध्ये साध्या वेशातील पोलीस तैनात असल्याचे दिसून येते. तसेच व्हाट्स अप आणि फेसबुकवर येणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी काही कर्मचारी नेमण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर भावना व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी दक्षता घेण्याची गरज आहे. अन्यथा निवडणुकीनंतर पोलिसांचा ससेमिरा मागे लागण्याची दाट शक्यता आहे.

याबाबत बोलताना अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे म्हणाले,” कार्यकर्त्यांनी उमेदवारांचे समर्थन करताना सामाजिक भान जपण्याची गरज आहे. आपल्या कृत्यामुळे समाजात तेढ निर्माण होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. निवडणुकीच्या अनुषंगाने समाजातील छोट्या मोठ्या हालचालींवर पोलिस नजर ठेवून आहेत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.