Pune : सरासरी 50 टक्के मतदान; टक्केवारी घसरल्याने निकाल धक्कादायक लागणार ?

एमपीसी न्यूज – पुणे शहरात सरासरी 50 टक्के मतदान झाले. मतदान कमी झाल्याने निकाल धक्कादायक लागणार असल्याची खमंग चर्चा सुरू आहे. 24 ऑक्टोबर रोजी निकालानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. सर्वाधिक कमी मतदान पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवजीनागर मतदारसंघांत झाले. तर सुरुवातीला कमी मतदान असणाऱ्या कसबापेठ मतदारसंघांत नंतर वाढ झाली.

शिवाजीनगर मतदारसंघात भाजपचे नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे विरुद्ध काँगेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट अशी थेट लढत आहे. कोथरूडमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या समोर मनसेचे किशोर शिंदे यांनी तगडे आव्हान उभे केले. मनसेच्या इंजिनमध्ये काँगेस – राष्ट्रवादीनेही इंधन भरले. त्यामुळे इंजिन जोरात धावल्याची चर्चा आहे. पाटील यांची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यांचा कोणत्याही परिस्थितीत पराभव झालाच पाहिजे, यासाठी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना आदेशच दिले होते.

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघांत स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे विरुद्ध काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, वडगावशेरीत आमदार योगेश मुळीक विरुद्ध सुनील टिंगरे, पर्वती मतदारसंघात भाजप शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ विरुद्ध राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी कदम, हडपसर मतदारसंघात आमदार योगेश टिळेकर विरुद्ध राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, मनसेचे गटनेते वसंत मोरे त्याचप्रमाणे कसबा पेठ मतदारसंघात महापौर मुक्ता टिळक विरुद्ध काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे, मनसेचे अजय शिंदे असा तिरंगी सामना होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खडकवासला मतदारसंघांत राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके विरुद्ध आमदार भीमराव तापकीर अशी थेट लढत झाली.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी

पुणे कॅन्टोन्मेंट 43, शिवाजीनगर 44, कोथरूड 48.17, वडगावशेरी 50, पर्वती 48, हडपसर 47, खडकवासला 51, कसबा पेठ 52, असे सरासरी 50 टक्के मतदान झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.