Pune : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज- माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी पतीकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना कात्रज, सुखसागरनगर परिसरात घडली.

विजया नितीन कांबळे (वय 39, रा. सुखसागरनगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी याबाबत विजया यांच्या आईने तक्रार दिली आहे. त्यानुसार पती नितीन वामन कांबळे (वय 48) याला पोलिसांनी अटक केली आहे.

भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजया व नितीन यांचा विवाह झाल्यानंतर किरकोळ कारणावरून वाद होत होते. विजया यांनी माहेरहून पैसे घेऊन यावे यासाठी नितीन याने त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी पैसे आणण्यास नकार दिल्यानंतर शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यामुळे त्यानी 19 ऑक्टोबर रोजी राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. भारती विद्यापीठ पोलिस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.