Pune : जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाकडून 12 विद्यार्थीनींचा विनयभंग

आरोपी शिक्षकाला दोन दिवसांची पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज – पुण्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकाने 12 अल्पवयीन विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सतत सुरू होता. याप्रकरणी शिक्षण विस्तार अधिकारी, पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिक्षकाला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

पोलीस उपनिरीक्षक सी एस चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक हा शाळेच्या मधल्या सुट्टी दरम्यान विद्यार्थीनींना जवळ बोलावून त्यांच्या सोबत अश्लिल चाळे तसेच गैरकृत्य करून त्यांचा विनयभंग करीत असे. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. तसेच पीडित मुलींनी हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून धमकावत असे.

दरम्यान, जिल्हा परिषद  शाळेच्या केंद्र प्रमुखांना असा काही प्रकार घडत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याअंतर्गत एक समिती नेमली. या समितीने शाळेत तपास केला असता, हा प्रकार उघडकीस आला. शिक्षण विस्तार अधिका-यांनी याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली.

फिर्यादीनुसार, आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले. आज गुरुवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक चौधरी पुढील तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.