Pune News : पुणे जिल्ह्यातील 12 शाळा होणार ‘आदर्श शाळा’

एमपीसी न्यूज – राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील जिल्हा परिषदांच्या 300 शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या शाळांत पुणे जिल्ह्यातील 12 शाळांचा समावेश आहे.

राज्यातील प्रत्येक तालुक्यातील एक अशा 300 शाळांची काही निकषांच्या आधारावर निवड करण्यात आली आहे. या इयत्ता पहिली ते सातवी वर्गाच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत.

आदर्श शाळांत भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि काही प्रशासकीय बाबी यांचा समावेश असेल, असे राज्य सरकारने म्हटले आहे. भौतिक सुविधांमध्ये स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चांगल्या स्थितीतील वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडासाहित्य, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालयांचा समावेश असेल तसेच, दळणवळणाची साधने असावीत.

विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उत्तम शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर भाषा व गणित विषयातील मूलभूत संकल्पना अवगत होणे अनिवार्य असल्याचे सरकारने म्हटले आहे.

या आहेत त्या बारा शाळा
मावळ तालुक्यातील आंबळे, मुळशीतील कासारअंबोळी, पुरंदरमधील सुपे खुर्द, शिरूरमधील मौजलवाडी, वेल्ह्यातील वेल्हे बुद्रुक, आंबेगावमधील थुगाव, बारामतीतील सांगवी, भोरमधील उत्रोली, इंदापूरमधील रुई, दौंड तालुक्यातील पाटस, जुन्नरमधील बेल्हे येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, खेडमधील चासमधील पाइट या शाळांचा निवड झालेल्या शाळांत समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.