Talegaon Dabhade: कंटेनरची दुचाकीला धडक बसून बारावीच्या विद्यार्थी मृत्युमुखी

एमपीसी न्यूज – कंटेनरची दुचाकीला धडक बसून झालेल्या  अपघातात बारावीचा एक विद्यार्थी जागीच मृत्युमुखी पडला. तळेगाव -चाकण रस्त्यावर येथील मनोहर नगर प्रवेशद्वाराजवळ आज (गुरुवारी) संध्याकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.

प्रतीक विजय ढोरे (वय१८ रा.इंदोरी, ता.मावळ) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. तो इंद्रायणी महाविद्यालयात इयत्ता बारावी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असून तो बारावीच्या परीक्षेला बसला होता. गुणी आणि हुशार विद्यार्थी म्हणून त्याचा नावलौकिक होता. मावळ तालुका भजपाचे अध्यक्ष प्रशांत ढोरे यांचा तो पुतण्या आहे.

चाकणहून वडगाव मावळच्या दिशेने जाणारा कंटेनर (एम एच १२एफ झेड ३६८४) मनोहरनगर जवळ आला असता कंटेनरची दुचाकीला धडक बसली. अपघातानंतर घटनास्थळी कंटेनर सोडून चालक पळून गेला.

या अपघातामुळे तळेगाव-चाकण रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तळेगाव -चाकण रस्त्यावरील अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची मालिका थांबता थांबत नसल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हे अपघात टाळण्यासाठी देहूरोड प्रमाणे तळेगावमध्येही उड्डाणपूल बांधावा किंवा वाहतूक लवकरात लवकर बाह्यवळण रस्त्याने वळवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.