Pimpri : प्रलंबित प्रश्नांची नाराजी मतदानातून उघड, 12 हजार 756 मतदारांनी वापरला ‘नोटा’

चिंचवडमध्ये सर्वाधिक नोटा, 5 हजार 874 जणांचे नोटाला मतदान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 12 हजार 756 मतदारांनी इलेवट्रॉनिक मतदान यंत्रावरील ‘नोटा’ बटनाचा वापर केला आहे. त्यामध्ये चिंचवडमध्ये सर्वाधिक 5 हजार 874 मतदारांनी ‘नोटा’चे बटन दाबले आहे. त्यामुळे शहरातील प्रलंबित प्रश्नांची नाराजी मतदानातून उघड झाल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

आपल्या मतदारसंघातील एकाही उमेदवाराला मत द्यायचे नसल्यास ‘नन ऑफ दि अबव्ह’ (नोटा) चा वापर करण्याचा अधिकार निवडणुकीत मतदारांना मिळाला आहे. काही ठिकाणी स्थानिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच काही ठिकाणी एकही उमेदवार पसंतीचा नसल्याचे सांगत 12 हजार 756 मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला.

चिंचवड मतदारसंघातून सर्वाधिक 5 हजार 874 मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली. अवैध बांधकामे, रिंगरोड, शास्तीकर यांबाबत रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्याचा स्फोट मंत्री पंकजा मुंडे यांच्या थेरगावातील जाहीर प्रचार सभेतही पाहायला मिळाला होता. त्याबाबतची नाराजी रहिवाशांनी ‘नोटा’च्या माध्यमातून व्यक्त केली. त्याचबरोबर विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांच्याबाबत मतदारांमध्ये नाराजी होती. त्यामुळेही ‘नोटा’चा आधार घेतल्याची चर्चा आहे.

पिंपरी मतदारसंघातून 3 हजार 246 मतदारांनी ‘नोटा’चा अवलंब केला. राखीव मतदारसंघ आणि उमेदवारांबाबतची उदासिनता या विरोधात मतदारांनी नाराजी व्यक्त केली. भोसरी मतदार संघात 3 हजार 636 मतदारांनी ‘नोटा’ समोरील बटन दाबले. या मतदार संघात गावकी – भावकीचे राजकारण सुरु होते. आमदार विलास लांडे आणि महेश लांडगे यांच्या लढतीत ‘नोटा’चा वापर मतदारांना योग्य वाटला. गाववाला नको असा सूर व्यक्त करत मतदारांनी ‘नोटा’चा वापर केल्याचीही चर्चा रंगली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.