Talegaon Dabhade : महागलेल्या कांद्याच्या पोत्यांवर डल्ला मारून चोरट्यांची दिवाळी!

कांद्याची पोती आणि गल्ल्यातील चिल्लर केली लंपास

एमपीसी न्यूज- तळेगाव- चाकण मार्गालगत असलेल्या तळेगावातील छत्रपती भाजी मार्केटमध्ये आज पहाटे अज्ञात चोरट्यांनी सुमारे आठ ते दहा दुकानांमध्ये चोरी करून  सध्या ‘भाव’ खाणाऱ्या कांद्याची पोती व भाज्यांसह दुकानाच्या गल्ल्यात असलेल्या रकमेवर डल्ला मारला. ही घटना आज (गुरुवारी) सकाळी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती भाजी मार्केट मध्ये सुमारे शंभर एक भाजीची दुकाने असून सकाळपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत भाजी मंडई सुरु असते. भाजी मंडई बंद झाल्यानंतर भाजी विक्रेते आपल्या जवळील शिल्लक भाज्या, भाज्यांची पोती मोठ्या ताडपत्री अथवा प्लास्टिक कागदाखाली झाकून ठेवतात.

आज, गुरुवारी ( दि. 31) रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरांनी सुमारे आठ ते दहा दुकानांमध्ये भाज्यांची चोरी करून दुकानांचे गल्ले फोडुन त्यात असलेल्या चिल्लरवर चोरट्यांनी डल्ला मारला. मार्केटमध्ये असलेली आले, लसुण, कांदा, बटाटे व इतर किंमती भाज्यांची चोरट्यांनी चोरी केली आहे. प्रामुख्याने कांद्याची पोत्यांची चोरी झाली असून संपूर्ण भाजीमंडईत भाज्या अस्तव्यस्त पसरल्या आहेत. घटनेची माहिती समजताच तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामे सुरू आहेत.

याविषयी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप गाडीलकर यांनी सांगितले कि, सात ते आठ दुकानांमध्ये चोरी झाली असून प्रामुख्याने कांद्याची पोती चोरण्यात आली आहेत. अंदाजे सात ते आठ कांद्याची पोती चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर इतर भाज्या अस्ताव्यस्त पसरवल्या आहेत. या प्रकरणी पंचनामे करून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.