Pune : बॉम्बे नेटिव्ह इन्फेंट्री रेजिमेंटचा 140 वर्षांपूर्वीचा फ्लॅग पुणेकरांना पाहण्याची संधी

एमपीसी न्यूज- ब्रिटिश काळात 1812 मध्ये स्थापन झालेल्या तसेच विविध लढाईमध्ये शौर्य दाखवलेल्या 12 व्या बॉम्बे नेटिव्ह इन्फेंट्री रेजिमेंटचा सुमारे 140 वर्षांपूर्वीचा फ्लॅग पुणेकरांना पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. उद्या, शुक्रवारी खडकीच्या ऑल सेंट चर्चमध्ये हा फ्लॅग पुणेकर इतिहासप्रेमींना पाहता येणार आहे. जुन्या अतिशय जीर्ण झालेल्या या फ्लॅगला जतन आणि संवर्धन करण्याचे काम इतिहास संशोधक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. आता हा फ्लॅग तसेच या फ्लॅगवरून ट्रेसिंग करून तयार करण्यात आलेले आणखी तीन फ्लॅग लवकरच जम्मू काश्मीर येथील भारतीय सैन्यदलाच्या 4 राजपुताना रायफल्सकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. या निमित्ताने पुन्हा एकदा या रेजिमेंटच्या इतिहासाला उजाळा मिळणार आहे.

ब्रिटिशांच्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने 1812 मध्ये बॉम्बे नेटिव्ह इन्फेटरी रेजिमेंटची स्थापना केली. या रेजिमेंटने खडकी येथे 5 नोव्हेंबर 1817 मध्ये झालेल्या अँग्लो मराठा युद्धामध्ये सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे 1839 मध्ये अफगाणिस्तानात तर 1856-57 मध्ये पर्शिया येथे झालेल्या लढाईमध्ये देखील भाग घेतला होता. त्यानंतर पुन्हा 1879-80 मध्ये अफगाणिस्तान झालेल्या युद्धामध्ये भाग घेतला होता. 1820 मध्ये या रेजिमेंटचे नामकरण 23 रेजिमेंट ऑफ बॉम्बे नेटिव्ह इन्फेटरी असे करण्यात आले. 1880 मध्ये या रेजिमेंटने स्वतःचा एक नवीन फ्लॅग तयार केला. या सर्व युद्धाचे स्मरण म्हणून या फ्लॅगवर पर्शिया अफगाणिस्तान आणि खडकीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला.

पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही रेजिमेंट भारतीय लष्करामध्ये सामील झाली. आणि त्याचे नामकरण 4 राजपुताना रायफल्स असे करण्यात आले. परंतु पुढे काळाच्या ओघात त्यांचा फ्लॅग इतिहासजमा झाला. इतका मोठा इतिहास असताना 4 राजपुताना रायफल्स या रेजिमेंटने अलीकडेच आपल्या मूळ फ्लॅगचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी या रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाला भेट दिली. या ठिकाणी भारत इतिहास संशोधक मंडळाचे विश्वस्त डॉ. सचिन जोशी यांच्याशी संपर्क साधला. मग सुरु झाली या फ्लॅगला शोधायची मोहीम ! शोध घेत असताना या रेजिमेंटचा मूळ फ्लॅग खडकीच्या ऑल सेंट चर्चमध्ये असल्याची माहिती मिळाली.

याबाबत माहिती देताना डॉ. सचिन जोशी म्हणाले, “खडकीच्या ऑल सेंट चर्च या ठिकाणी भेट दिली असता उंच ठिकाणी एका लाकडी कपाटामध्ये हा फ्लॅग आढळून आला. या फ्लॅगचा किंवा या रेजिमेंटचा इतिहास कुणालाच ठाऊक नसल्यामुळे हा फ्लॅग इतकी वर्षे धूळ खात पडलेला होता. दुर्दैवाने या फ्लॅगची योग्य निगा राखली न गेल्याने हा फ्लॅग पूर्णपणे जीर्ण झालेला दिसून आला. इतका जीर्ण झालेला होता की तो हात लावल्यावर फाटला.शेवटी या फ्लॅगचे योग्य तऱ्हेने जतन आणि संवर्धन करण्यात आले. तसेच ट्रेसिंग करून तंतोतंत तसेच आणखी तीन फ्लॅग तयार करण्याचे काम राजीव संत यांनी केले ”

उद्या, शुक्रवारी हा मूळ फ्लॅग आणि त्यावरून तयार केलेले फ्लॅग खडकीच्या ऑल सेंट चर्चमध्ये पुणेकर इतिहासप्रेमींना पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आता हे सर्व फ्लॅग जम्मू काश्मीर येथील भारतीय सैन्यदलाच्या 4 राजपुताना रायफल्सकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.