_MPC_DIR_MPU_III

Chinchwad : गुडविन ज्वेलर्स ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक करून पळून गेल्याचा गुन्हा

एमपीसी न्यूज – गुडविन ज्वेलर्सच्या व्यवस्थापकीय संचालक, व्यवस्थापक आणि संचालकांनी मिळून ग्राहकांना सोने गुंतवणूक आणि फिक्स डिपॉझिट करायला सांगून लाखो रुपयांची फसवणूक केली. फसवणूक करून सर्वजण दुकान बंद करून पळून गेले असल्याचा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_IV

योहन्नान थॉमस (वय 64, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, गुडविन ज्वेलर्सचे व्यवस्थापक रितेश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), संचालक सुनील कुमार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), व्यवस्थापकीय संचालक सुधीर कुमार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), व्यवस्थापक रवी के नायर, सेतू पनीकर, संचालक आणि इतर सहकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपींनी संगनमत करून फिर्यादी थॉमस आणि त्यांच्या पत्नीला सन 2012 पासून 28 ऑक्टोबर 2019 पर्यंत सोने गुंतवणुकीत आणि फिक्स डिपॉझिट या स्वरूपात पैसे गुंतवण्यास सांगितले. त्यानुसार, थॉमस आणि त्यांच्या पत्नीने मिळून एकूण २९ लाख रुपयांची गुंतवणूक केली. फिक्स डिपॉझिटचा कालावधी संपून देखील गुंतवलेले पैसे आरोपींनी थॉमस यांना परत केले नाहीत. पैसे परत न करता आरोपी दुकान बंद करून पळून गेले. थॉमस यांच्या प्रमाणेच इतर अनेक लोकांची आरोपींनी फसवणूक केली असल्याचे थॉमस यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, 22 ऑक्टोबर 2019 रोजी गुडविन ज्वेलर्समध्ये गुंतवणूक केलेल्या ग्राहकांनी चिंचवड येथील गुडविन ज्वेलर्सच्या दुकानात गर्दी केली. दुकानात सोन्याचा फुटका मणी देखील न दिसल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी संबंधितांना संपर्क केला असता ग्राहकांचे पैसे परत करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे, ग्राहकांनी संपूर्ण दिवस चिंचवड स्टेशन चौकातील गुडविन ज्वेलर्सच्या दुकानात घालवला. पण त्यांचे पैसे त्यांना मिळाले नाहीत. त्यानंतर, 30 ऑक्टोबर रोजी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.