Pimpri: भाजपसाठी धोक्याची घंटा, महापालिकेतील कारभाराचा बसला फटका !

मतदार राष्ट्रवादीकडे झुकू लागले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता, लोकसभेला शहरातील तीनही मतदारसंघातून युतीच्या उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळाले असतानाही सहाच महिन्यात चिंचवडमध्ये भाजप उमेदवार लक्ष्मण जगतापांचे मताधिक्य घटले. तर, पिंपरीत शिवसेना उमेदवार गौतम चाबुकस्वार यांचा पराभव झाला. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांचे मताधिक्य वाढले असले. तरी, राष्ट्रवादी पुरस्कृत विलास लांडे यांच्या मतांची आकडेवारी देखील वाढली आहे. त्यामुळे मतदार पुन्हा राष्ट्रवादीला पंसती देत असल्याने भाजप-शिवसेनेसाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे. महापालिकेतील सत्तेच्या रोषाचा फटका भाजपला बसल्याचे जाणकार सांगत आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. चिंचवडमधून बारणे यांना तब्बल 96 हजार 758 आणि 41 हजार 294 मताधिक्य होते. केवळ सहा महिन्यातच मतदारांनी वेगळी भूमिका घेतली. पिंपरीतून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांचा तब्बल 19 हजार 618 मतांनी विजय झाला आहे. तर, चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांचे मताधिक्य घटले असून 38 हजार 498 मतांनी विजय झाला. त्यांना लाखाच्या मताधिक्याची अपेक्षा होती.

”लोकसभेला श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांचे मनोमिलन झाले. त्यामुळे जगताप बेफिकीर राहिले. अपक्ष राहुल कलाटे यांनी प्रचारात पहिल्यापासून लक्ष घातले. हिंदुत्वांच्या मतांचा पाठिंबा मिळविण्यात कलाटे यशस्वी ठरले. शिवसेनेने त्यांच्यावर कारवाई केली नाही. जगताप यांच्यावरील नाराज हिंदुत्ववाद्यांचीही कलाटे यांना मदत झाली. त्यामुळे जगताप यांचे मताधिक्य घटल्याचे” ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी सांगितले.

”पिंपरीत गौतम चाबुकस्वार हे नको असे शिवसैनिकांचे मत होते. खासदार बारणे यांनी हट्ट केल्याने चाबुकस्वार यांना उमेदवारी मिळाली. पण, शिवसैनिक नाराज होते. शिवसेनेला पुढच्यावेळी मतदारसंघावर ‘क्लेम’ करता येऊ नये यासाठी भाजपने चाबुकस्वार यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले. राष्ट्रवादीचा एकच उमेदवार आणि सर्वांनी एकत्रित काम केल्याने त्यांना यश आल्याचेही” सातुर्डेकर यांनी सांगितले.

”भोसरी भाजपला की शिवसेनेला जाणार याचा विचार न करता महेश लांडगे यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतल्याचा त्यांना फायदा झाला. विलास लांडे यांनी उशिरा निवडणुकीत उडी घेतल्याचा त्यांना फटका बसल्याचे” सातुर्डेकर यांनी सांगितले.

”लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नावाचा मोठा करिष्मा होता. केंद्रामध्ये विरोधक प्रबळ नसल्याने नागरिकांनी लोकसभेला भाजपला पसंती दिली. लोकसभा आणि विधानसभेला नागरिक वेगळा विचार करतात. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पर्याय आहेत. राज्यात भाजप नको म्हणून नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पसंती दिली. भाजपचा जनाधार घटत आहे. भाजपमध्ये पक्षांतर्गत कुरघोडी, आयारामांना घातलेल्या पायघड्या आणि सत्तेवरील नाराजीचा फटका भाजपला बसला आहे. महापालिकेतील सत्तेच्या रोषाचा भाजपला फटका बसला”, असे विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार विनोद पवार यांनी केले.

”महापालिकेच्या कारभाराचे प्रतिबिंब विधानसभा निवडणुकीत उमटले. महापालिकेच्या गलथान कारभाराचा फटका भाजपला बसला आहे. नागरिक महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी देखील राज्यात सत्तेत असताना राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत महापालिकेच्या कारभाराचा फटक बसत होता”, असे निरीक्षणही पवार यांनी नोंदविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.