Pune : पु.ल. देशपांडे जन्मशताब्दी वर्षात जगभर ‘ग्लोबल पुलोत्सव ‘ साजरा !

'ग्लोबल पुलोत्सव'साठी 'पुण्यभूषण फौंडेशन ' चा पुढाकार यशस्वी

एमपीसी न्यूज- मराठी मनातील मानाचे हसरे, आनंदी पान असलेल्या पु ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जगभर पसरलेल्या मराठी जनांनी पुलंच्या स्मृती जागवाव्यात यासाठी पुण्यभूषण फौंडेशनने घेतलेला पुढाकार यशस्वी झाल्याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष डॉ सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली. जन्मशताब्दी समारोपानिमित्त पुण्यभूषण फौंडेशन ‘च्या प्रयत्नांची माहिती डॉ देसाई यांनी दिली.

अजरामर साहित्यिक पु.ल.देशपांडे यांच्या नोव्हेंबर 2018 ते नोव्हेंबर 2019 या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारताबाहेर संपूर्ण जगात ग्लोबल पुलोत्सव साजरा करण्याचे आव्हान पुण्यभूषण फौंडेशनने पेलले . त्यासाठी पाचही खंडातील सुमारे 80 महाराष्ट्र मंडळांशी इ-मेल,दूरध्वनी द्वारे मे 2018 पासून वारंवार संपर्क साधण्यात आला.आणि पाचही खंडात उत्साहात कार्यक्रम पार पडले .

महाराष्ट्र मंडळांचे अध्यक्ष,सचिव यांना ग्लोबल पुलोत्सवाची संकल्पना विषद करून आपापल्या शहरात स्थानिक पातळीवर हा पुलोत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला अनेक महाराष्ट्र मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन ग्लोबल पुलोत्सवआयोजित करण्याचे ठरवले. पुण्यभूषण फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यासाठी झुरिच व पॅरीस या शहरांत भेट देऊन आले.

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना तेथील मराठी मंडळांना ग्लोबल पुलोत्सव आयोजित करावा असे सुचविले व त्यासाठी पुण्यातील पुण्यभूषण फौंडेशन बरोबर संपर्क करण्यास सांगितले. सिंगापूर, शांघाय, हॉंगकॉंग, मॉरिशस, जेरुसलेम, पॅरिस, डल्लास, सिडनी येथील मराठी मंडळांचे प्रतिनिधी पुण्यात आले असता त्यांच्याबरोबर डॉ. सतीश देसाईंच्या प्रत्यक्ष बैठका झाल्या. नॉर्थ अमेरिकेच्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षांशीसुद्धा मोबाईल वर बोलणे झाले. ज्यांना शक्य आहे त्यांनी स्थानिक कलाकार बरोबर घेऊन व इतरांनी भारतातील प्रसिध्द मराठी कलाकारांच्या मदतीने ग्लोबल पुलोत्सव साजरा करावा अशी विनंती करण्यात आली आणि बघता बघता पुलंची जन्मशताब्दी हा महामहोत्सव झाला .

चंद्रकांत काळे, गिरीश कुलकर्णी, विनय कोपरकर, संदीप खरे, वंदन नगरकर आणि ठिकठिकाणच्या स्थानिक रसिक कलाकारांनी पुलंच्या स्मृती जागविणारे कार्यक्रम केले. युरोपमध्ये झुरीच, नेदरलँड्, फ्रँकफर्ट, डेन्मार्क, पॅरिस येथे कलाकार चंद्रकांत काळे व गिरीश कुलकर्णी यांनी पुल यांच्यावर बहारदार कार्यक्रम केले. सिंगापोर, मॉरिशस, शांघाय, जेरुसलेम-इस्राइल, सलाला-ओमान येथे कलाकार वंदन नगरकर व सहकाऱ्यांचा कार्यक्रम रंगला.

ऑस्ट्रेलिया,नॉर्थ अमेरिका येथे स्थानिक मराठी रसिकांचे कार्यक्रम झाले, ‘जगात शेक्सपिअरचे नाव जसे प्रसिद्ध आहे ,त्याप्रमाणे जिथे जिथे मराठी माणूसआहे तिथे पु.ल. देशपांडे हे नाव पोचावे व प्रत्येकाला शक्य आहे त्याप्रमाणे त्याने पुलोत्सव साजरा करावा हा विचार आम्ही जगभर देण्याचा प्रयत्न केला व त्यात आम्ही बव्हंशी यशस्वी झालो’, असे डॉ सतीश देसाई यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.