Pune : अखेर पाऊस ओसरल्याने अतिवृष्टीमुळे हैराण पुणेकरांना दिलासा! तीन दिवसांत लागणार थंडीची चाहूल!

एमपीसी न्यूज- अरबी समुद्रामधील ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यामुळे अखेर पाऊस ओसरू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे हैराण झालेल्या पुणेकरांची अखेर पावसापासून सुटका झाली आहे. येत्या तीन दिवसांत पुणे शहरात थंडीची चाहूल लागणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. 

 

दोन दिवसांत पुण्याच्या किमान तापमानात घट झाली असून आज किमान तापमान 18.4  अंश नोंदवले गेले. येत्या तीन दिवसांत पुणे शहरात थंडी आणखी वाढणार असल्याचे भाकित पुणे वेधशाळेने केले आहे.

अरबी समुद्रातील ‘महा’ चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागात बुधवारी व गुरुवारी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र हे चक्रीवादळ पोरबंदरच्या दिशेने फिरल्यामुळे या वादळाची तीव्रता कमी झाली आहे. आता पावसाचा जोर ओसरला असून येत्या 10 तारखेपासून पुण्याचे तापमान कमी होऊन पुणेकरांना थंडीची चाहूल लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून थंडीला सुरुवात होते. परंतु, यंदा चक्रीवादळाच्या स्थितीमुळे पाऊस लांबला आणि थंडीचे आगमन देखील लांबणीवर पडले. पुणे जिल्ह्यामध्ये सध्या पहाटे धुके पडत असून दुपारी कडक ऊन तर संध्याकाळी ढगाळ वातावरण तयार होत आहे. मात्र पुढील काही दिवसापासून शहरातील तापमान 18 ते 15 अंश सेल्सियस दरम्यान राहणार असल्याचा अंदाज आहे. पुणे शहरात गुरुवारी कमाल 31 अंश सेल्सियस तर किमान 19 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. तर आज, शुक्रवारी सकाळी कमाल 31 तर किमान 18.4 अंश सेल्सियस इतके नोंदले गेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.