Pune : राम मंदिराबरोबरच रामराज्य यावे ही अपेक्षा – राज ठाकरे

एमपीसी न्यूज- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अतिशय आनंद झाला असून शहीद कारसेवकांच्या बलिदानाला न्याय मिळाला आहे अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. अयोध्या- बाबरी मशीद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. आज बाळासाहेब असायला पाहिजे होते, निर्णय ऐकून त्यांना मनापासून आनंद झाला असता असेही राज ठाकरे म्हणाले.

राम जन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज आपला ऐतिहासिक निकाल देताना अयोध्येमधील वादग्रस्त जागा हिंदूंचीच असून या जागेवर ट्रस्ट स्थापन करून या जागेवर मंदिर बनविण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत.

राज ठाकरे म्हणाले, “लवकरात लवकर राम मंदिर व्हावे हीच इच्छा आहे. राम मंदिर उभे राहील पण त्याबरोबर खऱ्या अर्थाने रामराज्य यावे ही या देशाची अपेक्षा आहे. ज्याच्यासाठी इतकी वर्ष संघर्ष झाला त्याचं चीज झालं. आजच्या निर्णयातून एक गोष्ट सर्वात जास्त जाणवली ती म्हणजे आज बाळासाहेब असायला पाहिजे होते, निर्णय ऐकून त्यांना मनापासून आनंद झाला असता”  असे राज ठाकरे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.