Lonavala : सावधान ! नामांकित संस्थांच्या नावे फेक वेबसाईट बनवून ग्राहकांना घातला जातोय ऑनलाईन गंडा

सायबर गुन्हेगारी रोखण्याकरिता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज- सावधान…आपणही सायबर गुन्हे करणार्‍या टोळीचे शिकार होऊ शकता. नामांकित सामाजिक संस्था, हाॅटेल, शाॅप यांच्या नावे फेक वेबसाईट बनवून ग्राहकांचा विश्वास संपादित करत ग्राहकांना ऑनलाईन गंडा घालणारी सायबर टोळी कार्यरत झाली आहे. आपली फसवणूक टाळण्याकरिता प्रत्येक ग्राहकांना आँनलाईन व्यवहार करताना त्यामधील गोपनीय माहिती, ओटीपी नंबर, कार्डचा सिव्हिव्ही नंबर, क्युआर कोड कोणालाही देऊ नये. तसेच फसवे फोनकाॅल व आँफरच्या फंदात पडून फसगत करुन घेऊ नका असे आवाहन लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात या अनोळखी सायबर टोळीच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे.

लोणावळा शहर हे पर्यटनाचे शहर असल्याने याठिकाणी अनेक नामांकित संस्था तसेच हाॅटेल व रेस्टाॅरंट आहेत. या संस्थाच्या नावलौकिकाचा फायदा घेत काही सायबर क्षेत्रातील गुन्हेगार मंडळी या संस्था व अस्थापनाच्या नावे फेक वेबसाईट बनवतात, त्यामध्ये बुकिंग करण्याच्या नावाखाली लिंकच्या माध्यमातून आपल्या खात्याची माहिती तसेच शब्दांचा खेळ करत बँकेचा रिमोट एक्सेस घेत ऑनलाईन गंडा घालत आहेत. असे प्रकार अनेक ग्राहकांच्या सोबत घडले आहेत.

ऑनलाईन व्यवहारांबाबत असलेले अज्ञान व दुसर्‍यावर सहज विश्वास ठेवण्याची मानसिकता याचा अभ्यास करुन हे सायबर गुन्हे होत आहेत. ऑनलाईन व्यवहार करणार्‍या व्यक्तीची देखील फसगत केली जाते. अनेकवेळा आपल्याला फोन येतो, तुमच्या नंबरला ठराविक रक्कमेचे बक्षीस जाहीर आले, ती रक्कम तुमच्या खात्यात भरण्याकरिता तुमचा बँक खाते क्रमांक द्या, नागरिक देखील फुकट काही मिळतंय म्हंटल की कसलाही विचार न करता तातडीने बँकेची गोपनीय माहिती, ओटीपी क्रमांक देऊन टाकतात. एटीएम मधून पैसे काढताना व्यवहार कळत नसल्याने दुसर्‍या व्यक्तीला पैसे काढून देण्याची विनंती करतात व फसतात.

कोणतीही बँक ग्राहकाकडे ओटीपी नंबर, एटीएम कार्ड नंबर, पिन कोड तसेच सिव्हिव्ही नंबर मागत नाही, असा फोन आल्यास तो फेक आहे हे ध्यानात घेऊन फोन काँल बंद करायला हवा. आपली ऑनलाईन फसगत टाळण्याकरिता तुमचा पासवर्ड देखील हॅक होईल अशी कोणतीही गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका असे आवाहन लोणावळा शहर पोलिसांनी केले आहे.

शासकीय मदतीच्या नावे फसगत होण्याची शक्यता

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, नुकसान भरपाईची रक्कम खात्यात जमा करण्याच्या नावाखाली फेक काँल द्वारे शेतकर्‍यांचे खाते क्रमांक व गोपनीय माहिती मिळवून फसवणूक केली जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी कोणालाही बँकेची गोपनीय माहिती देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्याला आलेला कॉल हा अधिकृत आहे का याची खात्री झाल्याशिवायकॅशलेस व्यवहार करु नये.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.