Pune : स्वित्झर्लंडचे प्रसिद्ध कवी, गायक ‘युर्कझॉक 1001’ यांचे कविता वाचन ऐकण्याची संधी

एमपीएसी न्यूज- स्वित्झर्लंडचे प्रसिद्ध कवी, गायक रोलण्ड युर्कझॉक अर्थात युर्कझॉक 1001 यांच्या कविता त्यांच्याच तोंडून ऐकण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे पुण्यातील गोएथ इन्स्टिट्यूट मॅक्स म्युलर भवन आणि स्वित्झर्लंड दूतावास, मुंबई यांच्या सहयोगाने आयोजित ‘स्पोकन बीट्स’ या कविता वाचन कार्यक्रमाचे. सोमवारी ( दि. 18) बोट क्लब रस्त्यावरील गोएथ इन्स्टिट्यूट मॅक्स म्युलर भवन या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता सदर कार्यक्रम पार पडेल. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

_MPC_DIR_MPU_II

युर्कझॉक 1001 यांचा जन्म 1974 साली स्वित्झर्लंड मधील वॅडन्सविल येथे झाला असून ते झ्युरिकमध्ये स्थायिक झालेले आहे. ‘युर्कझॉक 1001’ या टोपण नावाने ते कविता करतात. 1966 पासून आजपर्यंत त्यांचे तब्बल सहा अल्बम्स प्रकाशित झाले असून स्वित्झर्लंड या देशात बोलल्या जाणा-या शब्दांचे प्रवर्तक म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘स्पोकन बीट्स’ या अल्बम्समधील कविता या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणेकरांना ऐकायला मिळणार आहेत.

देश विदेशात युर्कझॉक यांचे अनेक कार्यक्रम होत असतात आजपर्यंत त्यांनी बर्लिन पोएट्री फेस्टिव्हल, लुसर्न येथील वोर्डस फेस्टिव्हल, मॉस्को मधील इलेक्ट्रो थिएटर, फिलाडेल्फिया येथील किमेल सेंटर, न्यूयॉर्क येथील डॉईशस हौस या ठिकाणी कविता वाचनासाठी हजेरी लावली आहे. युर्कझॉक यांची खासियत म्हणजे ते आपल्या कवितांमधून आपली दृष्टी, आपले मत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतात. केवळ कविता वाचन नाही तर शब्दांची फेक, आवाजातील चढउतार, सादरीकरण हा देखील प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असते. पुण्यातील कार्यक्रमामध्ये युर्कझॉक यांचा हाच अविष्कार पाहता येणार असून कार्यक्रम इंग्रजी, जर्मन आणि स्विस-जर्मन भाषेत होईल. स्वित्झर्लंडच्या भारतातील दूतावासाचे यासाठी विशेष सहकार्य लाभले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.