Pimpri : नवीन महापौरांना सव्वा वर्षच संधी मिळणार ?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच सत्ता आलेल्या भाजपने पहिल्या अडीच वर्षात दोघांना महापौरपदाची संधी दिली आहे. पहिले सव्वा वर्ष च-होलीचे नितीन काळजे आणि दुसरे सव्वा वर्ष जाधववाडीचे राहुल जाधव यांना संधी दिली. त्यामुळे आता नवीन महापौरांना देखील सव्वा वर्षच संधी मिळणार का? याची चर्चा भाजप नगरसेवकांमध्ये सुरु झाली आहे.

महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपची एकहाती सत्ता आली. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून महापालिकेवर पहिल्यांदाच ‘कमळ’ फुलले. आमदार लांडगे यांचे कट्टर समर्थक च-होलीचे नितीन काळजे यांना भाजपचा पहिला महापौर होण्याचा मान मिळाला. तर, जगताप समर्थक भोसरी, इंद्रायणीनगरच्या सीमा सावळे स्थायी समितीच्या पहिल्या अध्यक्षा झाल्या. भाजप निष्ठावान असलेले पूर्णानगरचे एकनाथ पवार यांच्याकडे सभागृह नेतेपदाची धुरा सोपविण्यात आली.

भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील कोणत्याही महापालिकेत सव्वा वर्षानतर महापौर बदलला नसताना पिंपरीत बदल करण्यात आला. काळजे यांच्यानंतर आमदार लांडगे यांचे दुसरे समर्थक चिखलीचे राहुल जाधव यांना महापौरपद दिले. आमदार जगताप यांच्या समर्थक अशी ओळख असलेल्या वाकडच्या ममता गायकवाड दुस-या स्थायी समिती अध्यक्षा झाल्या. तर, स्थायीचे विद्यमान अध्यक्ष विलास मडिगेरी भोसरीतील असले तरी ते आमदार जगताप यांचे समर्थक मानले जातात.

भाजपने राज्यात सत्ता असलेल्या महापालिकेतील महापौरांना अडीच वर्ष संधी दिली. परंतु, पिंपरी-चिंचवड त्याला अपवाद ठरले. पिंपरीत पहिल्या अडीच वर्षात दोघांना महापौरपदी संधी देण्यात आली. पहिले सव्वा वर्ष च-होलीचे नितीन काळजे आणि जाधववाडीचे राहुल जाधव यांनी दुस-या सव्वा वर्षात संधी देण्यात आली. त्यामुळे आता नवीन महापौरांना अडीच वर्ष की सव्वा वर्षच संधी दिले जाते हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.