Lonavala : नायगाव येथील शिवराजे हाॅटेलवर पोलिसांचा छापा; 53 हजाराचा दारुसाठा जप्त

एमपीसी न्यूज- नायगाव येथे मुंबई पुणे महामार्गावरील हाॅटेल शिवराजे या ठिकाणी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत काँवत यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री छापा मारून 52 हजार 775 रुपयांचा बेकायदा दारुसाठा जप्त केला.

अवैध व्यवसायकांवर धडक कारवाई करण्याचा इशारा दोन दिवसांपूर्वी काँवत यांनी दिला होता. त्यानुसार लोणावळा ते वडगाव दरम्यानच्या हाॅटेल व धाबे चालकांना हाॅटेल परिसरात बेकायदा व विना परवाना दारु विक्री करु नये अशा लेखी सूचना देऊनही दारु विक्री सुरु असल्याची माहिती समजल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

दोन दिवसांपुर्वी वडगाव हद्दीतील दोन हाॅटेलांवर अशीच कारवाई करत दारुसाठा जप्त करण्यात आला होता. नायगाव येथे शिवराजे हाॅटेलच्या मागील बाजुला असलेल्या घरात हा दारुसाठा ठेवण्यात आला होता. ग्राहकांच्या मागणीनुसार ती दारु पुरवली जात असे. लोणावळा उपविभाग सहाय्यक पोलीस अधीक्षक काँवत व पोलीस कर्मचारी व कामशेत पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी ही कारवाई केली.

मागील दोन दिवसात झालेल्या कारवाया या कामशेत व वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांना अवैध धंद्यांची खबर लागते मात्र त्या भागाचे प्रमुख असलेल्या पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याला आपल्या हद्दीत काही अवैध सुरु आहे याचा मागमूस लागू नये यामध्ये गौडबंगाल असल्याची शंका नागरिक उपस्थित करत आहेत. काँवत यांच्या धडक कारवाईची सर्वत्र चर्चा आहे. तक्रारीची दखल घेतली जात असल्याने नागरिक देखील थेट वरिष्ठांना अवैध धंद्याची खबर देत असल्याने पोलीस खात्यातील ‘कलेक्टरां’चे धाबे दणाणले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.