Vadgaon Maval : बेकायदा हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज- तीन चाकी टेम्पोतून बेकायदा 385 लिटर गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. तसेच शिरगाव (ता.मावळ) हद्दीतील गावठी हातभट्टीवर कारवाई करून 2 लाख 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. 19) सकाळी साडेसहाच्या सुमारास कान्हे (ता.मावळ) हद्दीतील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर हॉटेल सिंध ए पंजाब समोर करण्यात आली.

मुलाराम सनाराम चौधरी (वय 33 रा. बारणे वस्ती, मोशी पुणे) सतीशकुमार रामराज कोरी (वय 37 रा. मोशी पुणे) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक राजाराम खोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाराम चौधरी व सतीशकुमार कोरी व त्यांच्या ताब्यातील तीनचाकी टेम्पो (एम एच 12 ई एफ 2543) मधून बेकायदेशीरपणे 385लिटर गावठी हातभट्टीची दारू घेऊन जात असताना, कान्हे गावच्या हद्दीतील महामार्गालगत असणाऱ्या हॉटेल सिंध ए पंजाब समोर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपीना पकडून मुद्देमाल ताब्यात घेतला.

आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन अधिकारी व कर्मचारी यांनी शिरगावच्या हद्दीत असणारी हातभट्टी उध्वस्त करून 630 लिटर गावठी दारू, साडेपाच हजार लिटर रसायन, दोन भट्टी बॅरल, एक दुचाकी व तीनचाकी टेम्पो असा एकूण 2 लाख 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना वडगाव मावळ न्यायालयासमोर हजार केले असता दोन हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची मुक्तता करण्यात आली.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजाराम खोत, निरीक्षक संजय डेरे, उपनिरीक्षक नरेंद्र होलमुखे, विठ्ठल रसाळ, सहायक दुय्यम निरीक्षक अशोक राऊत, जवान प्रदीप गवळी, भगवान रणसुरे, भागवत राठोड, स्वाती भरणे, अर्जुन भताने आदींनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.