Pimpri : पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना उपसूचनेद्वारे सहशहर अभियंतापदी बढती

एमपीसी न्यूज – पिंपरी महापालिका पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना महापालिकेत नव्याने निर्माण झालेल्या पर्यावरण विभागातील सहशहर अभियंता या पदावर बढती देण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या नियंत्रणाखाली पर्यावरण अभियांत्रिकी विभाग, जलनि:सारण विभाग, उद्यान विभागआदी पर्यावरण संवर्धन विषयक विभागांचे नियंत्रण सोपविण्यासही महापालिका सभेत उपसचुनेद्वारे मान्यता देण्यात आली.

पिंपरी – चिंचवड महापालिकेचा वर्ग एक आणि दोनच्या अत्यावश्यक सेवेतील पदांचा आकृतीबंध राज्य सरकारने मंजुर केला आहे. आधीच महापालिकेत अधिकारी,कर्मचा-यांची कमतरता असून सद्यस्थितीत अनेक अधिका-यांकडे एकापेक्षा अनेक विभागाचा अतिरिक्त पदभार सोपविलेला आहे. महापालिकेची वाढणारी लोकसंख्या आणि त्या प्रमाणात नागरी सेवेवर वाढणारा ताण विचारात घेता सरकारने मंजूर केलेल्या आकृतीबंधानुसार तातडीने पात्रताधारक अधिका-यांना बढती देण्याची कार्यवाही प्रशासनाने तातडीने करणे गरजेचे आहे.

त्याअनुषंगाने महापालिकेच्या आस्थापनेवर सहशहर अभियंता, पर्यावरण या अभिनामाचे एक पद मंजूर आहे. या पदासाठी निश्चित केलेल्या शैक्षणिक अर्हता व अनुभवाचा कालावधी या अटीनुसार सद्यस्थितीत या पदासाठी पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी हे पात्र होत आहेत. त्यांना पर्यावरण विभाग सहशहर अभियंता या पदावर बढती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या पदाच्या नियंत्रणाखाली पर्यावरण अभियांत्रिकी विभाग, जलनि:सारण विभाग, उद्यान विभागआदी पर्यावरण संवर्धन विषयक विभागांचे नियंत्रण सोपविण्यासही महापालिका सभेत उपसूचनेद्वारे मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.