Pune : वीस हजाराची लाच मागितल्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस शिपायाच्या विरोधात गुन्हा

लाच स्वीकारताना खासगी इसमाला रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज- अटक केलेल्या नातेवाइकांना जामीन मिळवून देण्याच्या कामात मदत करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक व पोलीस शिपायाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या वतीने लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या एका इसमाला देखील रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (दि. 24) ही कारवाई केली.

भीमराव भिकाजी मांजरे (वय 32, पोलीस उपनिरीक्षक कोंढवा पोलीस ठाणे), गोपाळ हरी दाभाडे (वय 25 पोलीस शिपाई कोंढवा पोलीस ठाणे) व राजू उस्मान अत्तर (वय 48 रा. कोंढवा ) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेल्या नातेवाइकांना जामीन मिळवून देण्याकामी मदत करण्यासाठी आरोपी भीमराव मांजरे याने तक्रारदाराकडे १ लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले. पोलीस शिपाई गोपाळ दाभाडे याने लाच स्वीकारण्याच्या कामात मदत करून खासगी इसम राजू उस्मान अत्तार यांच्याद्वारे लाचेची रक्कम स्वीकारली. लाच स्वीकारताच सापळा रचून आरोपी राजू अत्तार याला रंगेहाथ पकडण्यात आले. तिघांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र भीमराव मांजरे व गोपाळ दाभाडे फरार झाले.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण, संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.