Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा

एमपीसी न्यूज- महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या उलथापालथी नंतर अजित पवार यांनी आज, मंगळवारी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीमाना दिला. त्यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा देऊन या सत्तानाट्यावर पडदा पाडला आहे.  देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. पत्रकार परिषद झाल्यानंतर फडणवीस यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्त केला आहे. 

पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केल्यानंतर आमच्यासमोर कोणताही पर्याय राहिला नाही. यापुढे सत्ता स्थापन करणाऱ्यांना त्यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. मात्र हे सरकार ओझ्याखाली चालवावे लागणार असल्याचे देखील ते म्हणाले. जनादेश युतीच्या बाजूने होता. निकाल लागल्यानंतर सेनेने आकडे पाहून बार्गेनिंग सुरु केले. मात्र शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन कधीच देण्यात आलेले नव्हते असेही त्यांनी स्पष्ट केले. यापुढे आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून शेतकरी आणि जनतेच्या प्रश्नासाठी काम करू असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.