Pimpri : दहा वाड्या-वस्त्यांवरील 200 महिला म्हणाल्या, ‘आम्ही बी पास झालो..’

एमपीसी न्यूज – शहीद राजगुरू ग्रंथालय, आदिम संस्था, आंबेगाव आणि रोटरी क्लब, साक्षरता समिती, पुणे जिल्हा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या साक्षरता वर्गाचा गुणपत्रिका वितरण समारंभ आणि नवीन साक्षरता वर्गाचे उदघाटन आंबेगाव तालुक्यातील कुशिरे येथे नुकताच पार पडला. या कार्यक्रमात 200 महिलांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले. गुणपत्रिका मिळाल्यानंतर महिलांनी ‘आम्ही बी पास झालो’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे अध्यक्ष बहार शहा, सामाजिक कार्यकर्ते मोतीराम गेंगजे, रोटरी क्लब मेट्रोचे अंजली सहस्रबुद्धे, मकरंद फडके, ब्रिगेडिअर सुनील गोखले, शिरीष लव्हाटे, उज्ज्वला लव्हाटे, पोखरी गावचे उपसरपंच सचिन भागीत, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वडेकर, गावचे पोलीस पाटील राजू भोईर आदी उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात मागील दीड वर्षापासून 10 वाड्या-वस्त्यांवर साक्षरता वर्ग सुरू करण्यात आले होते. या साक्षरता वर्गात शिकणाऱ्या महिलांची मूलभूत साक्षरता परीक्षा राज्य साधन केंद्र,पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली. या मूलभूत साक्षरता परीक्षेत ज्या महिलांनी सहभाग घेतला, त्यांना गुणपत्रक वितरण कार्यक्रम व नवीन साक्षरता वर्गाचे उदघाटन झाले.

प्रमुख पाहुणे बहार शहा यांनी उपस्थित महिलांना साक्षरतेचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच साक्षरता हे कौशल्ये टिकवून आता रोजगार निर्मिती कशी वाढेल यासाठी प्रयत्न आपण केले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पेकारी यांनी केले. प्रास्ताविक अमोल वाघमारे यांनी तर आभार राजू घोडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.