Pune : दिव्यांगांच्या अर्जांची माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

दिव्यांग दिन ३ डिसेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा

एमपीसी न्यूज- दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात आलेल्या माहिती अर्जांचे संकलन माहिती अधिकाराखाली करण्याचे काम माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश प्रकाश निकम करीत आहेत. त्यांना माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या दिव्यांग कल्याण कार्यालयातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निकम यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे केली आहे. दिव्यांग दिन 3 डिसेंबर 2019 रोजी आंदोलन करण्याचा इशारा निकम यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मंगळवारी (दि. 26) दिव्यांग कार्यालयात दिले आहे.

4 ऑकटोबर 2018 पासून निलेश निकम हे दिव्यांग समस्या, प्रलंबित प्रश्न, अर्ज यांची चौकशी करणारे किती अर्ज माहिती अधिकाराखाली आले याची माहिती संकलित करण्याच्या हेतूने माहिती अधिकाराखालीच पाठपुरावा करीत होते. शासनाच्या कोषागारात त्यान्वये भरणा झाला कि नाही या विषयाची माहिती रीतसर मागत होते. मात्र, माहिती न मिळाल्याने आणि उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांनी अपील केले. त्यांनतर अर्धवट स्वरूपाची माहिती देण्यात आली. अनेक माहिती अर्जांचे चलनाचे पैसे न भरता माहिती दिल्याने शासनाचे कोषागाराचे किती चलन बुडाले ही माहिती दडवली जात आहे.

ही शासकीय सेवेत झालेली कुचराई असून त्याबद्दल संबंधितांवर कारवाई करावी, दिव्यांग कल्याण कार्यलयातील जनहित माहिती अधिकाऱ्यांकडून, अर्जदारांकडून बुडीत महसुलाची वसुली करावी अशी मागणी निलेश निकम यांनी पत्रकाद्वारे केली आहे. ही मागवलेली माहिती 2 डिसेंबर पर्यंत माहिती अधिकारात दिली नाही, तर दिव्यांग दिन 3 डिसेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रति त्यांनी कार्यकारी अधिकारी ,समाज कल्याण दिव्यांग विभाग ,पुणे ,वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, समाज कल्याण दिव्यांग विभाग,पुणे यांना पाठविल्या आहेत. प्रकाश निकम, डॉ. संजय जोशी, अरूण औचरे, अतुल जोशी, विलास निकम, बबन निकम, शैलेश हेंद्रे, मंगेश निकम , विशाल सुर्वे, पूनम हेंद्रे, स्वप्नील जोशी यांनी हे निवेदन दिले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.