Pimpri : आमदार लक्ष्मण जगताप यांचा गरिबांसाठी आरोग्य संजीवनी उपक्रम

एमपीसी न्यूज – भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहरातील नागरिकांना खर्चिक आणि मोठ्या आजारांवर पूर्णतः मोफत उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यासाठी “आरोग्य संजीवनी” हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे आता शहरातील कोणत्याही नागरिकाला पैसे नाहीत म्हणून मोठ्या आजारांवर उपचार व शस्त्रक्रियेपासून वंचित राहावे लागणार नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची रुग्णालये किंवा खासगी रुग्णालयांमार्फत शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. यांतील अनेक ठिकाणी रुग्णांच्या चाचण्या माफक दरात करण्याची सुविधा उपलब्ध आहे. परंतु, चाचणीनंतर मोठ्या आजारांवरील उपचार सेवा अत्यंत खर्चिक असते. खार्चिक सेवा असल्यामुळे गरीब तर सोडाच परंतु मध्यमर्गीय कुटुंबही या आजाराशी लढताना आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडतात. अशावेळी अनेक रुग्ण पैशांअभावी मोठ्या आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया करणे टाळतात किंवा शासकीय मदत मिळावी म्हणून सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजवतात. त्यात यश आले तरच पुढील उपचार गोरगरीब रुग्णांच्या नशीबी येतात.

त्यामुळे शहरातील एकही गोरगरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील रुग्ण पैशांअभावी मोठ्या आजारांवरील उपचार व शस्त्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी “आरोग्य संजीवनी” हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडून किडनी ट्रान्सप्लांट, कॅन्सर (कर्करोग), हृदयाची शस्त्रक्रिया, लहान बालकांच्या हृदयामधील छिद्राची शस्त्रक्रिया, खुब्यावरील शस्त्रक्रिया, मणक्याची शस्त्रक्रिया, मोफत करण्यासाठी मदत केली जाणार आहे. किडनी ट्रान्सप्लांटसाठी अंदाजे १० ते १२ लाख रुपये खर्च येतो. परंतु, ज्या रुग्णांच्या घरामध्ये रक्ताच्या नात्याचे किडनी डोनर आहेत. पण फक्त आर्थिक परिस्थितीमुळे शस्त्रक्रिया करणे शक्य होत नाही, अशा रुग्णांना पूर्णतः मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे.

लहान बालकांच्या ह्दयामधील छिद्राची शस्त्रक्रिया करण्यासाठी 5 ते 8 लाख रुपये खर्च येतो. परंतु, हा खर्च गोरगरिबांना परवडणारा नसल्याने हा आजार झालेल्या बालकांचे आई वडील मानसिक, शारीरिक व आर्थिदृष्ट्या अत्यंत त्रस्त होतात. अशा नागरिकांना आपल्या मुलाच्या हृदयाला असणाऱ्या छिद्रावर मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत केली जाणार आहे. त्यासाठी पिंपळेगुरव, शिवाजी चौक येथील जगताप पाटील कॉम्प्लेक्समधील जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधून नाव नोंदणी करावी . तसेच अधिक माहितीसाठी संबंधितांनी  8208487723 किंवा 02027285200 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावे, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like