Pimpri : महापालिकेच्या सर्वेक्षणात सापडल्या सहा हजार नवीन, वाढीव, वापरात बदल केलेल्या मिळकती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाने 18 हजार 600 बिगरनिवासी मिळकतींचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये नवीन 4 हजार 750, वाढीव बांधकामे 900 आणि वापरात बदल केलेल्या 360 अशा 6 हजार 10 मिळकती सापडल्या आहेत. तसेच 5 लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे कर संकलन विभागाने सांगितले आहे.

महापालिकेच्या करसंकलन विभागामार्फत 11 नोव्हेंबर 2019 पासून शहरातील बिगरनिवासी मिळकतींचे सर्वेक्षण सुरु केले आहे. 7 डिसेंबरपर्यंत मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी मिळकतीची माहिती द्यावी. सर्वेक्षणाच्या कामकाजास विरोध अथवा अडथळा निर्माण केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

ज्या नागरिकांनी अद्याप त्यांचे मिळकतीचे नवीन, वाढीव, वापरात बदल करसंकलन विभागाकडे नोंद करुन आकारणी केलेली नाही. अशा मिळकतधारकांनी करसंकलन विभागाचे सर्वेक्षण करणारे कर्मचारी अथवा संबंधित विभागीय कार्यालयात लेखी अर्ज करुन करआकारणी निश्चित करुन घ्यावी. तसेच नागरिकांना आकारणी न झालेल्या नवीन, वाढीव अथवा वापरात बदल झालेल्या मिळकती निदर्शनास आल्यास त्यांनी 9890350662 या व्हॉट्सअॅपवर मिळकतीचे पत्यांसह फोटो अपलोड करावेत.

मिळकतकराची पाच लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मिळकतींवर लवकरच जप्तीची कारवाई सुरु करण्यात येणार आहे. सर्व थकबाकी असलेल्या मिळकतधारकांनी मिळकत कराची थकबाकी भरणा करुन महापालिकेस सहकार्य करावे. मिळकत जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन कर संकलन विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.