Chakan : ‘पबजी’ मुळे बिघडले तरुणाचे मानसिक स्वास्थ ; नागरिकांनी केले पोलिसांच्या स्वाधीन

 

एमपीसी न्यूज- पबजी (PUBG) या गेमचे तरुणाईला अक्षरश: वेड लागले आहे. या खेळापायी आजवर अनेक विचित्र घटना घडल्याचे ऐकायला मिळत होते. पबजी गेममुळे मानसिक स्वास्थ बिघडलेल्या उच्चशिक्षित तरुणाने चाकण परिसरात चांगलाच गोंधळ घातला. या तरुणाला नागरिकांनी अखेर चाकण पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या हवाली केले.

अजित शिवाजी पवार ( वय 25, सध्या रा. मेदनकरवाडी,चाकण , ता. खेड, जि.पुणे ) असे या तरुणाचे नाव असून तो मुळचा इंदापूर व सोलापूर येथील असल्याचे पोलिसांना सांगत असून पोलीस त्याच्या मूळ गावाचा शोध घेत आहेत. सध्या तो चाकण पोलिसांच्या ताब्यात आहे. सातत्याने पबजी गेम खेळल्यामुळे या २५ वर्षीय तरुणाची मानसिक स्थिती अचानक ढासळल्याचे येथील त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून आक्रमक झालेल्या या तरुणाकडून पबजी गेम प्रमाणे हातवारे हावभाव करण्यात येत आहेत. त्याने काही पाळीव प्राण्यांवर खरेखुरे हल्ले करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याकडून रस्त्याने जाणाऱ्या वाहनांवर हातात लाकडी दांडके घेऊन गोळ्या झाडत असल्याचे हावभाव करण्यात येत आहेत. संबंधित रुग्णालयात योग्य उपचारासाठी दाखल करावे लागणार असून पोलीस त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. संबंधित युवकाच्या नातेवाईकांशी संपर्क झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे चाकण पोलिसांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासून पबजी या खेळावर भारतात बंदी आणली जावी अशी मागणी केली जात आहे. पण अद्याप तरी तशी बंदी आलेली नाही. एकीकडे पबजीवर बंदीची मागणी सुरु असताना दुसरीकडे तरुणाई मात्र या गेमपासून अजिबात दूर जाण्यास तयार नाही. केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थी व लाखो तरुण या गेमच्या आहारी गेले आहेत. यामुळे भयंकर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. पबजी गेमच्या अतिआहारी गेल्यामुळे अनेक ठिकाणी महाविद्यालयीन तरुणांची मानसिक स्थिती खालावत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

पालकांनी सजग होण्याची गरज 

पालकांनी मुलांना स्मार्ट फोन देताना काळजी घेणे आवश्यक आहे. मुलांच्या वागण्यातील बदलांवर लक्ष ठेवणे, मुलांचा एकलकोंडेपणा, होणारी चिडचिड, अभ्यासाकडे दुर्लक्ष, परीक्षेतील गुणांची घसरण याकडे पालक व शिक्षकांनी दुर्लक्ष करू नये. त्यांचा इंटरनेट वापर नियंत्रित ठेवणे. मुले कोणत्या वेबसाइटला भेट देतात, याची माहिती घ्यायला हवी. मुलांसोबत संवाद साधून त्यांना या खेळाच्या संभाव्य धोक्याविषयी माहिती देण्याची तसेच मुलांमध्ये जागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्याची गरज तज्ज्ञांद्वारे व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.