Chinchwad : राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेत पोलीस हवालदार परवीन पठाण यांना दोन सुवर्ण

एमपीसी न्यूज – तेराव्या महाराष्ट्र राज्य पोलीस शूटिंग स्पर्धेत निगडी पोलीस ठाण्यात कर्तव्यास असलेल्या पोलीस हवालदार परवीन पठाण यांनी चमकदार कामगिरी केली आहे. शूटिंगच्या दोन प्रकारांमध्ये त्यांनी दोन सुवर्णपदके मिळवली आहेत. या कामगिरीमुळे त्यांची बालेवाडी येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक यांनी राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन केले होते. 1 डिसेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत हडपसर येथे झालेल्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन खेळाडूंनी सहभाग घेतला. दोन्ही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. पोलीस हवालदार परवीन पठाण यांनी 300 मीटर रायफल प्रोन पोझिशन आणि 300 मीटर रायफल थ्री पोझिशन या दोन प्रकारांमध्ये दोन सुवर्ण पदके आपल्या नावावर केली आहेत. तर विशेष शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी रश्मी धावडे यांनी 10 मीटर पिस्टल प्रकारात एक सुवर्ण पदक मिळवले आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेत मिळवलेल्या या यशामुळे त्यांची महाराष्ट्र राज्य पोलीस नेमबाज संघामध्ये निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील ‘तेरावी ऑल इंडिया पोलीस शूटिंग स्पोर्ट्स चॅम्पियनशिप’ ही स्पर्धा बालेवाडी येथे होणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने या स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले आहे. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत भारतातील सर्व फोर्स सहभागी होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.