Wakad : काळेवाडी येथे सिग्नलवर भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडली अकरा मुले

एमपीसी न्यूज – सिग्नलवर भीक मागणाऱ्या एका महिलेकडे अकरा लहान मुले मिळून आली. हा प्रकार बुधवारी (दि. 18) काळेवाडी येथे उघडकीस आला. एकाच महिलेकडे अकरा मुले सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथील तापकीर चौक सिग्नलजवळ वेगवेगळया वयोगटातील अकरा लहान मुले भीक मागत होती. नगरसेवक अभिषेक बारणे यांना याबाबत संशय आला. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली. चौकशी करत असताना असे समजले की, एका भीक मागणाऱ्या महिलेने ही सर्व मुले तिची व तिच्या मोठ्या बहिणीची आहेत. दोघींचे पती त्यांचा सांभाळ करीत नाहीत.

मात्र, बारणे यांना प्रथमदर्शनी मानवी तस्करीचा प्रकार असल्याचे वाटत असल्याने त्यांनी मुलांना घेऊन थेट वाकड पोलीस ठाणे गाठले. वाकड पोलिसांनी मुलांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. मुले देखील पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नावर एकसारखी उत्तरे देत होती. त्यामुळे मुलांना प्रशिक्षण दिले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.