Pimpri: ‘डस्टबीन’ खरेदी म्हणजे करदात्यांच्या पैशांचा अपहार – भाजप नगरसेवक संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे तीन वर्षांपूर्वी ओला कचरा व सुका कचरा गोळा करण्यासाठी 29 कोटी रुपये खर्च करून खरेदी केलेले डस्टबिन धूळ खात पडलेले आहेत. वाटपाअभावी भांडार विभागाकडे या डस्टबीन पडून असताना आता पुन्हा नव्याने ठेकेदार आणि अधिकार्‍यांच्या अर्थपूर्ण व्यवहारातून डस्टबीन खरेदी करण्याचा डाव आखल्याचा आरोप करत ‘डस्टबीन’ खरेदी म्हणजे करदात्यांचे पैशांचा अपहार असून डस्टबीन खरेदीची निविदा तात्काळ रद्द करावी अशी मागणी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात वाघेरे यांनी म्हटले आहे की, महापालिकेत मनमानी कारभार सुरु आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तीन वर्षांपूर्वी ओला कचरा व सुका कचरा गोळा करण्यासाठी तब्बल 29 कोटी रुपये खर्च करून डस्टबिन खरेदी केली. मात्र, वाटपाअभावी ते करोडो रुपयांचे डस्टबिन धूळ खात पडलेले आहेत. महापालिकेने यापूर्वी डस्टबीन खरेदी केल्या आहेत. त्यातील करोडो रुपयांच्या डस्टबीन या महापालिकेच्या भांडार विभागाकडे वाटपाअभावी गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून पडून आहेत.

या डस्टबीन न वाटता नव्याने खरेदी करण्याचा ठेकेदार आणि अधिकार्‍यांच्या अर्थपूर्ण व्यवहारातून डाव होत आहे. यामुळे करदात्या नागरिकांचे 29 कोटी रुपये कचर्‍यात घातले जाणार आहेत. शहरात इतर अनेक कामे निधीअभावी खोळंबलेली असून वर्षानुवर्षे रखडलेल्या कामांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

पाणी, रस्ते, वीज, एलईडी बल्ब , ड्रेनेज यासारखी अनेक विकासकामे निधीअभावी खोळंबत असताना डस्टबीनसाठी 29 कोटी रुपयांची उधळपट्टी करणे. हा शहरवासीयांच्या कररुपातून जमा झालेल्या रक्कमेचा एक प्रकारे अपहार करण्याचाच प्रकार आहे. त्यामुळे तत्काळ डस्टबिन खरेदीचा निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.