Pimpri : पिंपरी-चिंचवडचा पाणी प्रश्न सोडवण्याबाबत खासदार बारणे यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

शास्तीकर संपूर्ण माफ करण्याची केली मागणी

एमपीसी न्यूज- धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठा असताना देखील पिंपरी-चिंचवडकरांना मुबलक पाणीपुरवठा होत नाही. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून त्याचे काम अद्याप सुरु झालेले नाही. तसेच पिंपरी-चिंचवडकर अजूनही शास्तीकरातून पूर्णतः मुक्त झालेले नाहीत. त्यामुळे शहराचा सरसकट शास्तीकर माफ करावा, याबाबत मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

पिंपरी-चिंचवड शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी संबंधित प्रशासनासोबत बैठक घेण्याचे आवश्यक असल्याचे निवेदन खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, ‘पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना धरणातून बंद पाईपलाईन मधून पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मंजुरी देखील मिळाली असून त्यावर अद्याप कोणतेही काम सुरु झालेले नाही. हा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत काही गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. शहर आणि समाविष्ट गावांची तहान केवळ पवना धरणातून येणा-या पाण्यावर भागणार नाही, यासाठी भामा आसखेड धरणातून 200 एमएलडी पाणी आणण्याची मंजुरी राज्य शासनाने दिली आहे. भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचे काम देखील अद्याप सुरु झाले नाही.

पिंपरी-चिंचवड शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी हे प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे असून त्यासाठी संबंधित प्रशासनासोबत बैठक घेणे आवश्यक आहे. यामुळे शहराला भेडसावणारा पाणी पुरवठ्याचा प्रश्न लवकर मार्गी लागेल. तसेच पूर्वीच्या सरकारने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचा 1 हजार 500 चौरस फुटांपर्यंतचा शास्तीकर माफ केला आहे. मात्र, आता हा शास्तीकर पूर्णपणे माफ करावा, अशी मागणी देखील खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.