Pimpri : भरदिवसा सराफी व्यापा-याची बॅग हिसकावून तीन लाखांची रोकड व 50 तोळे सोने लंपास

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वाधिक वर्दळीचा चौक म्हणून ओळखल्या जाणा-या पिंपरी चौकात सराफी व्यापा-याची बॅग दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावली. या बॅगेमधील दोन लाख 80 हजार रुपयांची रोकड आणि 50 तोळे धातूमिश्रित सोन्यावर चोरटयांनी डल्ला मारला. ही घटना आज, बुधवारी (दि. 25) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

रवी अमितचंद मेहता (वय 70, रा. मु. पो. आदनाला, जि. अमृतसर, पंजाब) असे व्यापा-याचे नाव आहे.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहता विविध शहरात फिरून सोने विक्रीचा व्यवसाय करतात. धातू मिश्रित सोन्याचे ते व्यापारी आहेत. व्यवसायानिमित्त ते पिंपरीत आले होते. पिंपरी येथील विक्रांत लॉज येथे ते मंगळवारी मुक्कामी होते. बुधवारी सकाळी त्यांना पिंपरीमधील एका ग्राहकाला भेटायला जायचे होते. त्यानुसार, सकाळी दहाच्या सुमारास ते लॉजमधून बाहेर पडले.

पिंपरी स्टेशन रोडवरून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पायी चालत येत होते. त्यांच्याकडे एक सॅक होती. ते चौकाजवळ असलेल्या रत्ना हॉटेलसमोर आले असता दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांची बॅग हिसकावली. त्यावेळी मेहता यांनी चोरट्यांना प्रतिकार केला. यामध्ये मेहता यांना किरकोळ जखम झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चोरट्यांना प्रतिकार करताना बॅगचा एक बंद तुटला आहे. मेहता यांच्या बॅगमध्ये दोन लाख 80 हजार रुपयांची रोकड आणि 50 तोळे धातूमिश्रित सोने होते. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस, गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे. पिंपरी पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.