Chinchwad : पत्त्यांच्या खेळात वारंवार पिसणी येते म्हणून मामाने भाच्याला काढले ‘पिसून’ 

एमपीसी न्यूज – पत्ते खेळत असताना वारंवार पिसणी येत असल्याने चिडलेल्या मामाने भाच्याला फावड्याच्या दांड्याने मारहाण केली. यामध्ये भाच्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. भाच्याने मामाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 26) रात्री साडेसातच्या सुमारास चिंचवड गावात घडली.

पप्पू उर्फ संतोष प्रभाकर लोंढे (वय 30, रा. एल्प्रो कंपनीसमोर, चिंचवडगाव) असे जखमी भाच्याचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अश्रू लाला मगर (वय 40) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोंढे एका खासगी कंपनीत मागील सहा महिन्यांपासून हाऊसकिपींगचे काम करतात. गुरुवारी रात्री करमणुकीसाठी फिर्यादी लोंढे आणि त्यांचे तीन मित्र राजूभाई अष्टोळे यांच्या घरात पत्ते खेळत बसले. त्यावेळी लोंढे यांचे मामा देखील खेळण्यासाठी आले. मेंढीकोट प्रकारचा पत्त्यांचा डाव खेळत असताना लोंढे यांचे मामा अश्रू यांच्यावर वारंवार पिसणी येऊ लागली.

वारंवार पिसणी येत असल्याने ‘मी सारखे-सारखे एकटा पत्ते पिसणार नाही’ असे अश्रू याने सांगितले. त्यावर ‘तुमची पत्ते पिसणी आली तर तुम्हालाच पिसावे लागेल’ असे लोंढे म्हणाले. याचा राग आल्याने आरोपी मामाने अष्टोळे यांच्या घरातील फावड्याचा दांडा काढला आणि त्या दांड्याने लोंढे यांच्या डोक्यात मारले. त्यावेळी लोंढे यांनी हात आडवा लावल्याने हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर मामाने भाच्याला बघून घेण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.