Maval : मावळातील केतन घारे व संकेत ठाकुर यांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील सडवली गावचा युवा मल्ल केतन नथू घारे, उर्से गावचा युवा मल्ल संकेत दामू ठाकुर यांनी पुणे जिल्हा व पुणे शहर निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक तर नवलाखउंब्रे येथील युवा मल्ल आकाश बबन पडवळ याने रौप्यपदक पटकावले आहे. केतन घारे याने जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पदक विजेत्या मल्लांना पराभूत करून सर्वांना धक्का दिला. केतनच्या या यशामुुळे त्याला पुणेे जिल्हा कुस्तीगीर संघाचा उत्कृष्ट कुस्तीगिराचा पुरस्कार देण्यात आला आहे. केतन आणि संकेत यांची 2 ते 7 जानेवारी या कालावधीत बालेवाडी पुणे येथे होणार्‍या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

हिंजवडी येथे झालेल्या पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत मावळ तालुक्यातील केतन घारे याने गादी विभागातील 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले असून, आकाश पडवळ याने गादी विभागातील 61 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले आहे. तसेच संकेत ठाकुर याने पुणे शहर राष्ट्रीय तालिम संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या शहर निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत गादी विभागातील 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. सुवर्णपदक विजेत्या केतन घारे व संकेत ठाकुर यांची 2 ते 7 जानेवारी या कालावधीत होणार्‍या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

हिंजवडी येथे झालेल्या पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत केतन घारे याने नेत्रदीपक कुस्त्या करत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पदक विजेत्या मल्लांना चितपटीने पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. केतनच्या या यशामुळे पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ पुरस्कृत कै.पै.माऊली काशिद यांच्या स्मरणार्थ पै.मंगलदास बांदल यांच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट कुस्तीगीर- 2019 हा पुरस्कार मावळचा पै.केतनला घारे यांना देण्यात आला आहे. केतनला रोख 21000 रुपये व भव्य सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

केतन व आकाश हा मारूंजी येथील पै. अमोल बुचडे कुस्ती संकुल येथे रुस्तम ए हिंद पै. अमोल बुचडे, प्रा. किसन बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे घेत आहे. संकेत ठाकुर हा पुण्यातील सह्याद्री कुस्ती संकुल येथे विजय काका बटाटे, संदीप पठारे, सियानांद यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे घेत आहे. विजेत्या सर्व मल्लांचे अॉलंपिकविर व मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मारूती आडकर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सरचिटणीस मारुती बहिरु आडकर, अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन पै. चंद्रकांत सातकर, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संभाजी राक्षे, उपाध्यक्ष पै. खंडू वाळुंज, सचिव पै. बंडू येवले, पै. मनोज येवले, पै. पप्पू कालेकर यांनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.