Talegaon Dabhade : नगरपरिषदेचा नवा अग्निशमन बंब सेवेमध्ये दाखल

एमपीसी न्यूज- मागील दीड वर्षापासून अग्निशमन बंबाशिवाय असलेल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व सुविधांनी युक्त नवीन अग्निशमन बंब दाखला झाला. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी त्याची पूजा करून नगरपरिषद सेवेमध्ये समाविष्ट करून घेतले.

यावेळी उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, नगरसेवक बांधकाम समिती सभापती संतोष शिंदे, अरुण भेगडे पाटील, रवींद्र आवारे, शोभा भेगडे, वैशाली दाभाडे, विभावरी दाभाडे, प्राची हेंद्रे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, शरद पाटील,पदमनाभ कुल्लुरवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

चाकण येथे 30 जुलै 18 रोजी मराठा क्रांती मोर्चाचा बंदोबस्त करताना आंदोलकांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा पूर्ण बांधणी केलेला अग्निशमन बंब पेटवून दिला. यामध्ये अग्निशमन बंब पूर्ण जाळून खाक झाला. या बंबाचा विमा उतरविला होता. त्यामुळे त्याच्या नुकसानीच्या ७० टक्के रक्कम विमा कंपनीकडून तर 30 टक्के रक्कम नगरपरिषद फंडातून भरून हा नवीन अग्निशमन बंब तयार करण्यात आला आहे. या बंबाच्या बांधणीसह एकूण सुमारे 60 लाख रुपये खर्च आला असल्याची चर्चा माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी यावेळी दिली.

या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये तळेगाव हद्दीत लागलेल्या लहान सहान आगीच्या घटनेत बाहेरून अग्निशमन बंब मागवावा लागत असे. आता तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा स्वतःचा अग्निशमन बंब झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.