New Delhi : कालचे बॅचमेट आजचे तिन्ही सैन्यदल प्रमुख

एमपीसी न्यूज- भारतीय सैन्यदलासाठी एक योगायोगाची आणि अभिमानाची गोष्ट घडली आहे. ती म्हणजे 43 वर्षांपूर्वी पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये एकाच बॅचमध्ये शिकणारे तीन विद्यार्थी आज भारतीय सैन्यदलाच्या तिन्ही शाखेच्या प्रमुखपदावर विराजमान झाले आहेत. लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे, वायु सेना प्रमुख- एयर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया व नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंह हे 1976 च्या बॅचचे तीन विद्यार्थी आज एकाचवेळी देशसेवेसाठी सज्ज झाले आहेत.

जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी 31 डिसेंबर रोजी लष्कर प्रमुख पदाचा पदभार स्वीकारला. माजी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी त्याच्याकडे लष्करप्रमुख पदाची सूत्रे सोपवली. त्यापूर्वी 31 मे रोजी एडमिरल करमबीर सिंह यांनी नौदल प्रमुख म्हणून सूत्रे आपल्या हातात घेतली तर एयर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी 30 सप्टेंबर रोजी वायुसेना प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली.

1976 साली हे तिघेजण एकाच बॅचमध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये लष्करी प्रशिक्षण घेत होते. त्यावेळी त्यांना माहित देखील नसेल की एक दिवस आपण तिघेजण एकाच वेळी प्रमुख पदावर आरूढ होऊन देशसेवेसाठी काम करणार आहोत.

एनडीए मध्ये एकाच बॅचमध्ये शिकणारे तिघेजण भारताच्या तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख म्हणून काम करण्याचा योगायोग भारतीय सैन्यदलाच्या इतिहासामध्ये 28 वर्षानंतर आलेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.