Talegaon Dabhade : उदयोन्मुख कवी मनीष मोरे यांच्या निराकार कवितासंग्रहाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज- उदयोन्मुख कवी मनीष रवींद्र मोरे यांच्या स्वरचित कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा येथील साप्ताहिक अंबर वृत्तपत्राच्या कार्यालयात झाला.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार, अंबरचे संपादक सुरेश साखवळकर, प्रमुख पाहुणे म्हणून शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण ओसवाल यांसह तळेगाव शहर पत्रकार संघाचे सचिव अतुल पवार, महावितरणाचे अधिकारी श्रीमंत शिंदे व रविंद्र मोरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मनीष रवींद्र मोरे यांनी निराकार या कवितासंग्रहाची शब्दबद्ध रचना केली असून विविध विषयांवरील ९३ कवितांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

सुरेश साखवळकर म्हणाले, ” आजच्या धावपळीच्या जगात आणि तरुण पिढीच्या युगात इंटरनेट अथवा इतर तांत्रिक बाबींकडे सर्वांचाच ओढा मोठ्या प्रमाणावर असताना अवघ्या 20 वर्षांच्या तरुणाने आदर्श घालून दिला आहे. आपल्या कल्पनेतील शब्दांना शब्दबद्ध करताना त्यास मार्मिक मुखपृष्ठ दिल्याने संग्रहाची प्रतिमा अधिकच उंचावली आहे”

“मावळ तालुक्यातील कला, साहित्य, संस्कृती आणि विद्येचे माहेरघर असलेल्या तळेगावात मनीषच्या कलेतून साकारेलल्या निराकार काव्यसंग्रहातूनच मनीषच्या जीवनाला आकार मिळेल” असा आशावाद किरण सोसवाल यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आयोजन शरद मोरे, एकनाथ शेवकर, शंकर हिंगे, रवींद्र गायकवाड, लक्ष्मण हेंद्रे, रोहित अवचर, निखिल गायकवाड, रोहन सोनटक्के, ओंकार बोराडे, गौरव शिंदे, चंदन भोगावडे व केशर कुंभावडेकर यांनी केले. कवी मनिष मोरे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन पत्रकार अतुल पवार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.