Pimpri : कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणार; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा महाराष्ट्र राज्य स्तरीय कामगार प्रतिनिधी मेळावा उत्साहात

एमपीसी न्यूज- कामगारांच्या प्रश्नांसाठी मी महापालिका, राज्यस्तरावर आणि केंद्रीय स्तरावर देखील पाठपुरावा करणार आहे. कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाला कसा मध्यममार्ग काढता येईल, याबाबत विविध पातळ्यांवर चर्चा करणार असल्याचे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.

भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा राज्यस्तरीय कामगार प्रतिनिधी मेळावा पिंपरी येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्यात कामगार प्रतिनिधींशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी लोकसभेचे खासदार गिरीश बापट, राज्यसभेचे खासदार अमर साबळे, महापौर उषा उर्फ माई ढोरे, पक्षनेते एकनाथ पवार, सदाशिव खाडे, सचिन पटवर्धन, अमित गोरखे, उमा खापरे, नगरसेविका सुजाता पालांडे, महेश कुलकर्णी, प्रमोद निसळ, उषा मुंडे, माउली थोरात, संदीप खर्डेकर तसेच मुंबई, ठाणे, पुणे, वसई, नाशिक, नागपूर, चंद्रपूर, जळगाव, पंढरपूर, तुळजापूर, उस्मानाबाद, सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, अकोला, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, नांदेड, बीड, उस्मानाबाद येथील कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “कंत्राटी कामगार पद्धतीच्या काही त्रुटी आहेत. त्यातील त्रुटी दूर करून मध्यम मार्ग काढता येईल का? याबाबत संबंधितांशी चर्चा केली जाईल. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सफाई कामगारांचे पैसे मागील अनेक वर्षांपासून मिळाले नाहीत. ते पैसे मिळण्यासाठी पुढील आठवड्यात महापालिका आयुक्तांशी भेटून चर्चा करणार आहे. विधानसभेच्या माध्यमातून राज्यस्तरावर तर भाजपा नेत्यांच्या माध्यमातून केंद्र स्तरावर कामगारांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे” असेही ते म्हणाले.

खासदार गिरीश बापट म्हणाले, “देशभरातील कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. कामगारांकडून काम करून घ्यायचे आणि फायदा झाल्यानंतर कामगारांना दुर्लक्षित करायचे, असे प्रकार कारखानदारांकडून केले जातात. याबाबत उत्पादनासाठी सर्व खर्च जाता कारखानदारांचा फायदा आणि कामगार यांच्यामध्ये एक प्रमाण निश्चित करायला हवे. कामगारांनी संघटित होऊन त्यांचे प्रश्न मांडले पाहिजेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सफाई कामगारांचा प्रश्न सोडवावा लागेल. कामगारांच्या मुलांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यास कामगारांची मुले चांगले शिक्षण घेऊ शकतील. अनेक संधी त्यांच्यासाठी उपलब्ध होतील” आपल्या यशामागे देखील कामगारांचीच खरी ताकद असल्याचे बापट म्हणाले.

_MPC_DIR_MPU_II

खासदार अमर साबळे म्हणाले, “कंत्राटी कामगार पद्धत बंद करण्याची मागणी बरोबर आहे. या मागणीला माझा पाठिंबा आहे. कामगारांच्या मागण्यांसाठी संसदेत आवाज उठवणार आहे.”

राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले म्हणाले, “राज्यभरात 169 कारखान्यांमध्ये राष्ट्रीय श्रमिक आघाडी ही संघटना काम करत आहे. देशात मागील काही वर्षात अनेक कारखाने आले आहेत. त्यामुळे देशातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पण मध्यंतरी 1969 साली कामगार कायदा आला आणि त्या कायद्याद्वारे काही ठराविक लोकांनी कारखान्यांचे कंत्राट घेतले. हे कंत्राटदार कामगारांची पिळवणूक करू लागले. हा कायदा केंद्र शासनाने तयार केला आहे. त्या कायद्यामुळे कामगारांचे हित साधले जात नाही. त्यामुळे तो कायदा रद्द करण्यासाठी केंद्रीय पातळीवर उपाय होणे गरजेचे आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सफाई कामगारांचा गंभीर प्रश्न आहे. मागील वीस वर्षांपासून हा प्रश्न पडून आहे. दरम्यान, ‘समान काम सामान वेतन’ असा निकाल न्यायालयाने दिला होता. मात्र, त्या निकालाची अंमलबजावणी न करता महापालिका पुन्हा न्यायालयात गेली. अपर कामगार आयुक्तांनी सफाई कामगारांचे पैसे देण्याचे आदेश दिले. त्या आदेशांना देखील महापालिकेने केराची टोपली दाखवली. 572 सफाई कामगारांपैकी 113 कामगारांचा मृत्यू झाला. पण त्यांना त्यांचे कष्टाचे पैसे मिळाले नाहीत. ते पैसे मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा लढा अजून सुरु आहे. राज्यभरातून आलेल्या कामगारांचे प्रश्न यशवंत भोसले यांनी मंचावरून मांडले. त्या प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढणार असल्याचे देखील त्यांनी उपस्थित कामगारांना आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.